खाडीचे पाणी शुद्ध करण्याला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:50 AM2017-08-01T02:50:07+5:302017-08-01T02:50:07+5:30
ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत.
ठाणे : ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. राष्ट्रवादीने त्यावरून विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची छाननी करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे शहराला २०२५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची ग्वाही नुकतीच पालिकेने न्यायालयात दिली आहे. परंतु, असे असतानाही ठाणे खाडीतील खारे पाणी शुद्ध करण्यासाठी पीपीपी मॉडेलचा आधार घेऊन तब्बल २२ हेक्टर जागा ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. जागा आपली, वीजही आपणच देणार, खाडीचे पाणीही फुकटात मिळणार, त्यानंतर शुद्ध केलेले पाणीसुद्धा पालिका विकत घेणार, हा सारा खर्च मोठा असून त्यामुळे पालिकेचेच नुकसान होणार आहे. यावरून महासभेतदेखील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आवाज उठवला होता. परंतु, त्यानंतरही सत्ताधाºयांनी हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. पालिकेच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारीसुद्धा राष्टÑवादीने सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी या योजनेच्या व्यवहार्यतेबाबत शंका उपस्थित करणारे वक्तव्य अधिवेशनादरम्यानच्या चर्चेत केले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.