उल्हासनगरात नगरसेवकावर शाखाप्रमुखाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:29 AM2018-06-19T03:29:31+5:302018-06-19T03:29:31+5:30
शिवसेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर पक्षाच्या शाखाप्रमुखासह सात ते आठ जणांनी हल्ला केला.
उल्हासनगर : शिवसेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर पक्षाच्या शाखाप्रमुखासह सात ते आठ जणांनी हल्ला केला. हल्ल्यात पाटील जखमी झाले असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकाराने शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, प्रभाग क्र-२० मधून विकास पाटील व लहान भाऊ आकाश पाटील शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. माजी महापौर अपेक्षा पाटील यांचे विकास पाटील पती असून वडील परशुराम पाटील, अंबरनाथ तालुका शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. विकास पाटील दोन मित्रांसह कोकालेगाव येथून रविवारी दुपारी ४ वाजता परत येत होते. त्यावेळी गणेश पाटील, जितू साळुंके यांच्यासह सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर कारण नसताना हल्ला केल्याचे तक्रारीत नमुद केले. हल्ला करणारे शिवसेना शाखाप्रमुख व शिवसैनिक असल्याने शहर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
विकास पाटील यांच्या गाडीचीही तोडफोड हल्लेखोरांनी करून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. शिवाजी पोलीस ठाण्यात गणेश पाटील, जितू साळुंखे याच्यासह सात ते आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गणेश पाटील व जितू साळुंखे याला पोलिसांनी अटक केली.
>कुर्ला कॅम्प शिवसेना शाखेचा जितू साळुंखे शाखाप्रमुख असून गणेश पाटील हाही कट्टर शिवसैनिक आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगून हल्लेखोराबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.