मीरा-भाईंदर तहसीलदार कार्यालयात संजय गांधी योजनेची शाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:36+5:302021-07-08T04:26:36+5:30
मीरा रोड : शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यतेच्या लाभासाठी मीरा-भाईंदर तहसीलदार कार्यालयात संजय गांधी योजनेची शाखा ...
मीरा रोड : शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यतेच्या लाभासाठी मीरा-भाईंदर तहसीलदार कार्यालयात संजय गांधी योजनेची शाखा सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. यामुळे मीरा-भाईंदरमधील निराधार-विधवा महिला, दिव्यांग, वृद्धांना ठाणे तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागणार नसल्याने दिलासा मिळणार आहे.
शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत घटस्फोटित, विधवा आदी महिलांना मासिक ६०० रुपये अर्थसहाय्य मिळते. शिवाय, श्रावणबाळ योजना आणि अन्य योजनेच्या लाभासाठी वृद्ध, दिव्यांग, महिलांना ठाण्याच्या तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागतात. मीरा-भाईंदरमधून ठाण्याला जाणे खर्चिक आहे. ठाणे लांब पडते व मोठ्या प्रमाणात असणारी वाहतूककोंडीमुळे त्रास होऊन दिवस वाया जातो. शहराची झपाट्याने वाढती लोकसंख्या पाहता भाईंदरच्या मॅक्सस मॉल मागील पालिका इमारतीत अपर तहसीलदार कार्यालय सुरू झाले आहे. त्यात संजय गांधी योजनेची शाखा सुरू न झाल्याने विविध अर्थसहाय्याच्या योजना या ठाणे तहसीलदार कार्यालयातून राबवल्या जातात. त्यामुळे संजय गांधी योजना शाखा मीरा-भाईंदर अपर तहसीलदार कार्यालयात सुरू करावी, अशी मागणी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, नगरसेविका हेतल परमार आदींनी केली होती. ‘लोकमत’ने ही समस्या मांडली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांना पत्र देऊन संजय गांधी योजना शाखेंतर्गत गरजूंचे अर्ज भाईंदर कार्यालयात स्वीकारावेत व नंतर ते ठाणे तहसील कार्यालयात पाठवावेत, असे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे नगरसेविका हेतल परमार यांनी आभार मानले आहेत.