ब्रॅन्ड ठाण्याचे ब्रँडिंग ठाणे दिवाळी सेलीब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 04:44 PM2017-10-06T16:44:29+5:302017-10-06T16:48:03+5:30
दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजविणे, वॉल पेंटिंग, बॅरिकेट्स पेंटिंग, फुटपाथ धुलाई, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषणाईने ठाणे लख्ख चमकविण्यासाठी महापालिकेचे तब्बल 110 इंजिनिअर दिवसरात्र कामाला लागले आहेत.
ठाणे - दिवाळीपूर्वी ठाणोकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजविणे, वॉल पेंटिंग, बॅरिकेट्स पेंटीग, फुटपाथ धुलाई, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषणाईने ठाणे लख्ख चमकविण्यासाठी महापालिकेचे तब्बल 110 इंजिनिअर दिवसरात्र कामाला लागले आहेत. एकूणच ब्रॅन्ड ठाण्याचे ब्रँडिंग करून दिवाळीचे ठाणेकरांबरोबर जबरदस्त सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
ठाणे शहराने स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु या स्मार्ट ठाण्यात आजही अनेक समस्यांना ठाणेकरांना समोरे जावे लागत आहे. खडय़ातून मार्ग काढणे, घाणोरडे फुटपाथ, धुळीमुळे होणारे प्रदुषण आदींसह इतर समस्यांमुळे ठाणेकर पुरता हैराण झाला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी तरी यातून सुटका होणार का? असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. अशातच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 10 दिवसांपूर्वी सर्व विभागांच्या अधिका-यांची बैठक घेऊन दिवाळीपूर्वी चांगले रस्ते, खड्डेमुक्त प्रवास, विद्युत रोषणाई आदी कामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता नगरअभियंता अनिल पाटील यांनी तत्काळ याचे व्हिजन तयार करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 110 इंजिनिअरची टीम आणि 600 जणांचे पथक कामाला लागले आहे.
शहरातील 3 लाख 59 स्केअर मीटर परिसरात पेंटिंगचे काम सुरू झाले आहे. पालिका आयुक्तांनी ब्रँडिंग ठाण्याच्या ज्या तीन छटा सांगितल्या आहेत. त्या छटा या पेंटिंगच्या माध्यमातून उमटल्या जात आहे. त्यानुसार या कामी खाजगी लोकसहभाग घेतला जात आहे. तसेच यामध्ये शहरातील 141 किमीचे 98 रस्ते आणि 22 चौक हे या माध्यमातून चकाचक केले जात आहेत. याठिकाणी रस्त्यावर पडलेले 1700 खड्डे बुजविण्याबरोबर डिव्हाडर पेटींग, बॅरीकेट्स पेंटिंग, आदींसह फुटपाथ, रस्ते धुलाई आदींची देखील कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. याशिवाय फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडांना देखील 9 इंचार्पयत रंगरंगोटी करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे, चौकांचे रुपडे पालटण्याचे काम सुरु आहे. याशिवाय रस्त्यावरील डेब्रीज उचलणो, गटार साफ करणो, कचरा उचलणो, आदींची कामेही केली जात आहेत. याशिवाय शहरातील मुख्य गार्डन, तलाव, आदींची देखील साफ सफाई केली जात आहे. येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत ही कामे केली जाणार असून यामध्ये झाडांवर विद्युत रोषणाई करणो, मोठय़ा लाईट्स लावणो, हायवे चकाचक करणो आदींच्या कामांचा देखील समावेश आहे.
एकूणच एखादा नागरिक जेव्हा दिवाळीची पहिली अंगोळ करुन घराबाहेर पडले तेव्हा त्याला ब्रँडिंग ठाण्याचे सेलिब्रेशन पाहावयास मिळावा हा मुख्य उद्देश असल्याची माहिती प्रभारी नगरअभियंता अनिल पाटील यांनी दिली.
22 ठिकाणी सेल्फी पॉंईट
शहरातील मुख्य रस्ते, चौक आदी ठिकाणी महत्वाचे स्पॉट तयार करुन ते सेल्फी पॉईंट म्हणून विकसित करण्याचे कामही या माध्यमातून केले जात आहे. शहरातील तरुणाईने याठिकाणी याचा अस्वाद घ्यावा हा उद्देश असल्याचे पालिकेने म्हणणे आहे. या कामासाठी पालिकेच्या माध्यमातून कोणताही खर्च करण्यात येत नसून जे ठेकेदार पालिकेकडे काम करीत आहेत, त्यांच्याकडूनही हे काम करुन घेतले जात आहे. तसेच काही विकासक, हॉटेल्सवाले आदींच्या माध्यमातून देखील ही कामे केली जात आहेत. त्यामुळे याचा कोणत्याही स्वरुपाचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.