बस सुविधेअभावी शिक्षणाला ब्रेक
By admin | Published: July 16, 2015 11:31 PM2015-07-16T23:31:51+5:302015-07-16T23:31:51+5:30
संपूर्ण देशात डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील २० ते ३० गावांना अद्याप दळणवळणाच्या सोयीसुविधा नसल्याने
बिर्लागेट : संपूर्ण देशात डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील २० ते ३० गावांना अद्याप दळणवळणाच्या सोयीसुविधा नसल्याने गावांतील मुलामुलींना इयत्ता सातवीनंतरचे पुढील शिक्षण घेता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया करण्याची घोषणा केली. यानंतर, राज्यातील शिक्षण विभागाने शाळाबाह्यमुलांचे सर्वेक्षण केले. याशिवाय, ‘सब बढे, सब पढे’ म्हणत सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शिक्षणावर लाखोंचा खर्च करीत आहे. मात्र, तरीही हजारो मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत.
कल्याण तालुक्यात १२५ जिल्हा परिषदेच्या शाळा असून ४७८ शिक्षक साडेबारा ते तेरा हजार विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करतात. १०१ गावे आणि १९ पाड्यांत जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथी अथवा सातवीपर्यंत वर्ग आहेत. पुढील शिक्षणासाठी त्यांना कल्याण, रायते, गोवेली, टिटवाळा, म्हारळ, वरप, मोहने, मांडा अथवा अंबरनाथ, मुरबाड येथे जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी त्यांना बस मिळत नाही. कारण, या गावांमध्ये बसच येत नाही. रस्ते आहेत, जागा आहे, परंतु बस नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.
म्हसरोंडी, भोंगळपाडा, आडिवली, वाघेरापाडा, पठारपाडा, नालेपाडा, झापणी, ठाकूरवाडी, अनखर, बेलपाडा, हल, वैतागवाडी, खोडाखडक, बांगरवाडी, काकडपाडा, पळसोली, वेहळे, गणेशवाडी, संतेचापाडा, नांदप, पिंपळोली, वाहोळीपाडा, बांधण्याचापाडा, राया, ओसर्ली, गेरसे, निंबवली, मोस, सांगोडा, कोठेरी, वासुंद्री आदी २० ते ३० गावपाड्यांत बसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत.
म्हसरोंडी गावातील ग्रामस्थांनी बस सुरू करावी म्हणून कल्याण एसटी आगार व्यवस्थापकाकडे अर्ज करूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. कल्याण आगारात एकूण ७४ बस, ४ मिनीबस आणि ४७८ कर्मचारी आहेत. मात्र, या गावांना बस मिळत नाही. यामुळे ३ ते ४ किमी अंतर तुडवत मुख्य ठिकाणी यावे लागते, अशी व्यथा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. यावर लवकरच तोडगा निघण्याची अशा आहे. (वार्ताहर)
आमच्या गावात ५९ घरे आणि २८२ कुटुंबे आहेत. गावात रस्ते, लाइट, पाणी, शाळा आहे, मात्र बस नाही. यामुळे १५ ते २० मुलेमुली पुढील शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.
- गणपत आगिवले, ग्रामस्थ, म्हसरोंडी
बस सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास मी स्वत: याचा पाठपुरावा करतो व बस कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करतो.
- डॉ. प्रदीप पवार, अति. गटशिक्षणाधिकारी, कल्याण
आमच्याकडे गावात बस सुरू करण्याबाबत कोणीही अर्ज केले नाहीत.
- एस.एन. रूपवते,
कल्याण आगारप्रमुख
गावातील ठरावीक मुलेच पुढील शिक्षणासाठी पायी ३ ते ४ किमी अंतर चालत जातात.
- विशाल आरेकर,
शिक्षक, जि.प. शाळा म्हसरोंडी, कल्याण