उल्हासनगरातून कुमार आयलानींच्या उमेदवारीला ब्रेक? पहिल्या यादीत नाव नाही, धाकधूक वाढली
By सदानंद नाईक | Published: October 20, 2024 07:15 PM2024-10-20T19:15:21+5:302024-10-20T19:17:05+5:30
उल्हासनगर मतदारसंघातून महायुतीतील शिंदेंसेनेचे राजेंद्र चौधरी, अजित पवार गटाचे भारत गंगोत्री यांनी उमेदवारीसाठी दावेदारी ठोकली.
सदानंद नाईक, उल्हासनगर : भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत उल्हासनगरचे विधमान आमदार कुमार आयलानी यांचे नाव नसल्याने, त्यांच्यासह समर्थकात धाकधूक वाढली. रविवारी भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी दिवसभर शहर पक्ष कार्यालयात ठाण मांडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या.
उल्हासनगर मतदारसंघातून महायुतीतील शिंदेंसेनेचे राजेंद्र चौधरी, अजित पवार गटाचे भारत गंगोत्री यांनी उमेदवारीसाठी दावेदारी ठोकली. तसेच पक्षाचे उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षाने आयलानी यांच्यावर आरोप करून पक्षाला सोडचिटी देत, वंचित पक्षात प्रवेश केला. तसेच उल्हासनगर मधून वंचित कडून उमेदवारी मिळविली. पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानीसह आयलानी यांचे समर्थक समजले जाणारे जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामानी यांनीही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे आयलानी यांचे नाव मागे पडते की काय? अशी चर्चा आधीपासून सुरू आहे. तसेच शहरविकास कामे सांगण्यासाठी आयलानी पाहिजे तसे अग्रेसर नसल्याने, नागरिकांत त्यांच्या विकास कामाबाबत संभ्रम निर्माण झाला.
आमदार कुमार आयलानी यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ओमी कलानी यांना महाविकास आघाडीकडून अद्याप तिकीट जाहीर न झाल्याने, आयलानी यांची उमेदवारी घोषित करणे थांबविले का?. असे अटकले बांधले जात आहे. शरद पवार गटाकडून कलानी यांचे नाव निश्चित समजले जात असलेतरी, रिपाइंचे माजी शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनीही दावेदारी ठोकली आहे. गेल्या वेळी उल्हासनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून क्रमांक ३ ची मते मिळविण्यात भालेराव यशस्वी झाले होते. भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे दिल्लीला गेल्याने, काहीतरी चमत्कार घडवतील का?. असेही चर्चा शहरात रंगली आहे. आयलानी यांचे नाव पहिल्या यादीत घोषित न झाल्याने, त्यांच्या समर्थकात नाराजीचा सुरू आहे.