दुष्काळग्रस्तांचे स्टॉल हटविणारे हात तोडू!

By Admin | Published: May 4, 2016 12:49 AM2016-05-04T00:49:32+5:302016-05-04T00:49:32+5:30

गावदेवी मैदानातील दुष्काळग्रस्तांना गेल्या चार दिवसांपासून हुसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टॉल हटविण्याच्या धमक्या दिल्याने, मंडप काढण्याचा दम

Break the hands of the defectors destroyed by stalls! | दुष्काळग्रस्तांचे स्टॉल हटविणारे हात तोडू!

दुष्काळग्रस्तांचे स्टॉल हटविणारे हात तोडू!

googlenewsNext

ठाणे : गावदेवी मैदानातील दुष्काळग्रस्तांना गेल्या चार दिवसांपासून हुसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टॉल हटविण्याच्या धमक्या दिल्याने, मंडप काढण्याचा दम दिल्याने, वीज जोडणी घेतल्यास कारवाई करू असा इशारा दिल्याने अखेर शिवसेना, मनसेने तातडीने धाव घेत दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला. स्टॉल हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात तोडू, असा सणसणीत इशाराच मनसेच्या नेत्यांनी दिला; तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याने महापौर संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेनेचे नेते यांनी तातडीने धाव घेत दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले. दुष्काळग्रस्तांना येथे राहण्यासाठी हवी ती मदत देऊ, परवानग्या देऊ, असे आश्वासन खुद्द महापौरांनीच दिले.
‘दुष्काळग्रस्तांच्या पोटावर नेत्यांचा पाय,’ अशा शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये मंगळवारी बातमी प्रसिद्ध होताच ठाण्यातील जागरूक नागरिकांनी सकाळी सकाळी दुष्काळग्रस्तांना ‘लोकमत’चे अंक नेऊन दिले आणि सुजाण ठाणेकर तुमच्या पाठीशी उभे राहतील, असा आत्मविश्वास दिला. त्यानंतरही लोकमत काय आहे, याचा अंदाज न आलेल्या भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने सकाळी थेट त्यांच्या स्टॉलवर येऊन ते स्टॉल हटविण्याच्या धमक्या तर दिल्याच, परंतु पालिकेच्या अतिक्रमण विभागाला सांगून हा स्टॉल हटविला जाईल, असा दम देखील दिला. स्टॉलला असलेली वीज जोडणी मंडपवाल्याला सांगून जबरदस्तीने बंद करण्यात आली. पुन्ही वीज दिल्यास तुझ्यावर केस करु, अशी धमकीही मंडपवाल्याला दिली. यामुळे आधीच परिस्थितीने गांजलेले, घाबरलेले हे दुष्काळग्रस्त हादरुन गेले. परंतु शिवसेना, मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.
भाजप कार्यकर्त्यांकडून दुष्काळग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या त्रासाचे वर्णन आणि त्यांच्या नेत्यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका ‘लोकमत’ने मांडल्यावर शिवसेना, मनसेच्या नेत्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. या दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते गावदेवी मैदानात दाखल झाले. युवा सेनेचे कार्यकर्तेही घटनास्थळी तत्काळ धावून आले. महापौर संजय मोरे, शहराध्यक्ष हेमंत पवार, विभागप्रमुख प्रकाश पायरे, युवासेनेचे नितीन लांडगे, किरण जाधव, अर्जुन डाभी, तसेच मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते तेथे पोचले.
त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी दुष्काळग्रस्तांना होत असलेल्या त्रासाची माहिती महापौराना दिली. ती ऐकताच, तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल आणि कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन महापौर मोरे यांनी दिले. एवढेच नव्हे, तर दम देऊन बंद पाडलेले स्टॉल सुरू करायला दोन्ही पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील महिलांनी तयार केलेले थालीपीठ विकत घेऊन खाल्ले.
दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलमध्ये कायदेशीर परवानगीचाच मुद्दा असेल तर ती देण्यासाठी खुद्द महापौरांनी त्यासाठीचा अर्ज मागवून घेतला आणि पालिकेकडून या स्टॉलना लागणारी रितसर परवानगी दिली जाईल, असे सांगितले. कायदेशीर कार्यवाही तत्त्काळ पूर्ण करण्याचे आदेशही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दुष्काळग्रस्तांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी आलेले पालिकेचे अधिकारीही तेथे उपस्थित होते. त्यांनी जेव्हा दुष्काळग्रस्तांचा जगण्याचा संघर्ष पाहिला, तेव्हा तेही हेलावून गेले. नगरसेविकेच्या पतीने सकाळी बंद केलेली वीज जोडणी तात्पुरती चालू करुन देण्यात आली. मनसेचे अविनाश जाधव यांनी स्वत: स्टूलवर उभे राहून तेथे बल्ब लावला आणि प्रतिकात्मकरित्या त्यांच्या आयुष्यात प्रकाश फुलविला. (प्रतिनिधी)

दुष्काळग्रस्तांना सहकार्यच : महापौर
ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांना आम्ही स्टॉलबाबत कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या दुष्काळग्रस्तांचा स्टॉल ना रस्त्यावर आहे ना फुटपाथवर. तो मैदानाच्या कम्पाऊण्डमध्ये असल्याने त्याचा त्रास कोणालाही नाही. मैदान ज्या महोत्सवाला देण्यात आले आहे. त्यांनाही या स्टॉलमुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही. हे दुष्काळग्रस्त कोणाकडून दयेची याचना करीत नाहीत. ते स्वाभिमानाने जगत आहेत. कष्ट करुन पोट भरत आहेत. त्यामुळे त्यांना सर्वांनीच सहकार्य केलेच पाहिजे. त्यांना पालिकेकडून कायदेशीर परवानगी दिली जाईल. तात्पुरत्या वीजजोडणीची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यांना जी मदत लागेल ती सर्व केली जाईल. जोपर्यंत ते इथे आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांना कोणताही त्रास होऊन देणार नाही. - संजय मोरे, महापौर, ठाणे

‘लोकमत’चे आभार!
जगण्याचा संघर्ष करणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या त्रासाला ‘लोकमत’ने वाचा फोडली आणि हा प्रश्न ठाणेकरांपुढे मांडल्याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आम्ही आभारी आहोत, अशा शब्दांत शिवसेनेच्या वेगवेगळ््या नेत्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. ‘लोकमत’ वेळोवेळी आमच्या अडचणींसाठी धावून आला. आजही त्यांनी केलेले सहकार्य आमच्यासाठी मोलाचे आहे, अशा शब्दांत कमलताई परदेशी यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

गावदेवीतील वडापावच्या गाड्या
कशा चालतात?
दुष्काळग्रस्तांना हुसकावण्याचा प्रयत्न करणे हे अयोग्यच आहे. आम्ही त्यांच्या बाजुने उभे राहणार आहोत. नव्हे, प्रत्येकानेच त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. गावदेवी मैदानाच्या आजूबाजूला वडापावच्या गाड्या लागल्या आहेत. तेथेही स्टोव्ह, गॅस असतात. त्यांना आशीर्वाद देणाऱ्यांना तिथे कधी आग लागण्याचा धोका जाणवला नाही का? तेथे हे प्रश्न निर्माण होत नाहीत का? अशा वेळी फक्त दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलवरील स्टोव्ह, गॅसमुळेच कशी आग लागेल? - प्रकाश पायरे,
विभागप्रमुख, शिवसेना

‘आम्ही गरीबांच्या पाठीशी उभे’
शिवसेना निश्चितपणे दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभी राहणार. भाजपाने जे मुद्द्े उपस्थित केले, ते योग्य नाहीत. यांना गोरगरिबांकडे लक्ष देता येत नाहीत का?
- हेमंत पवार,
शहरप्रमुख, शिवसेना

केळकरांनी भूमिका मांडावी
एकीकडे पक्षाच्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करायचा आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे सोडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करायचा? त्यांनी तसे करु नये. या प्रकरणात आमदार संजय केळकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मनसे सुरूवातीपासूनच दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आहे आणि कायमच राहील. - अभिजीत पानसे,
ठाणे शहर संपर्कप्रमुख, मनसे

हात लावण्याचा प्रयत्न केला, तर...
आम्ही दुष्काळग्रस्तांना नक्कीच पाठिंबा देऊ. एकीकडे मुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार, नगरसेवक त्यांना हुसकविण्याचा प्रयत्न करतात. अशी दुटप्पी भूमिका भाजपाने घेऊ नये. दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलला हात लावण्याचा प्रयत्न कोणी केला, तर आम्ही त्यांचा हात काढल्याशिवाय राहणार नाही.
- अविनाश जाधव, शहराध्यक्ष, मनसे

Web Title: Break the hands of the defectors destroyed by stalls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.