मॅरेथॉनला ब्रेक, अन्य स्पर्धांवरही सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:34 AM2020-08-01T01:34:39+5:302020-08-01T01:35:00+5:30

कोरोनामुळे सराव थांबला : फिटनेसवर खेळाडूंचा भर, नवोदितांचा आॅनलाइन सराव

Break the marathon, beat other competitions | मॅरेथॉनला ब्रेक, अन्य स्पर्धांवरही सावट

मॅरेथॉनला ब्रेक, अन्य स्पर्धांवरही सावट

Next

प्रशांत माने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पावसाळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला ब्रेक लागला आहे. सध्या यंत्रणा कोरोनाला प्रतिबंध घालण्यात व्यस्त असल्याने आॅगस्ट, सप्टेंबरच्या प्रारंभी होणाºया क्रीडा स्पर्धांमध्येही कोरोना खोडा घालण्याची दाट शक्यता आहे.


केडीएमसी हद्दीत खाजगी आणि महापालिका अशा मिळून ५८३ शाळा आहेत. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आॅगस्टनंतरही शाळा सुरू होतील का, याबाबत शंका आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, मॅरेथॉन स्पर्धा होतात. डोंबिवलीत शिवाई बालक मंदिर ट्रस्टतर्फे १८ वर्षे मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे. जुलैच्या अखेरच्या रविवारी ही स्पर्धा होते. साडेपाच हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. परंतु, ही स्पर्धा यावेळेस होऊ शकलेली नाही. तसेच केडीएमसीच्या वतीने महापौर मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते. गेली काही वर्षे ही स्पर्धा बंद आहे. यंदा कोरोनामुळे या स्पर्धेला खीळ बसली.


जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत एकूण ४९ प्रकारच्या खेळांच्या विविध स्पर्धा घेण्यात येतात. यात वैयक्तिक, मैदानी, सांघिक खेळांचा समावेश असतो. या स्पर्धांचा कालावधी साधारण आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीपर्यंत असतो. ठाणे जिल्हा परिषद आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा होतात. मागील वर्षी ३२७ शाळा सहभागी झाल्या होत्या. परंतु, सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्याचा फटका या स्पर्धांनाही बसणार आहे. शाळेच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधात्मक काम लावल्याने ते व्यस्त आहेत. त्यामुळे नियोजनासाठी कर्मचाºयांची कमतरता भासत आहे. कोरोनाचे सावट जानेवारी २०२१ पर्यंत कायम राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅगस्ट-जानेवारीदरम्यान पार पडणाºया क्रीडा स्पर्धा यंदा होण्याची शक्यता कमी आहे. यदाकदाचित झाल्या तरी त्याला प्रतिसाद किती मिळेल, अशी शंका आहे.


दरम्यान, क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाबाबत ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि मुंबई क्रीडा व युवक सेवा, उपसंचालक मुंबई विभाग यांच्याकडून सूचना दिल्या जातात. परंतु, अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती केडीएमसीचे क्रीडा पर्यवेक्षक राजेंद्र मुकणे यांनी दिली.

मुंबई असो अथवा कल्याणमधील सुभाष मैदानात मी दैनंदिन सराव करायचो. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात गेले चार महिने लॉकडाऊनमुळे सराव करता आलेला नाही. घराजवळ सराव करायचो, परंतु आता पावसात ती जागा चिखलामुळे गैरसोयीची झाली आहे. सरावाला खीळ बसली तरी शारीरिक फिटनेसवर भर दिला गेला आहे. सुभाष मैदानात सध्या खेळायला तसेच सरावाला बंदी असली, तरी फिटनेससाठी अडवणूक केली जात नाही.
- प्रणव धनावडे, क्रि केटपटू, कल्याण

कोरोनाच्या प्रादुर्भावात सद्य:स्थितीला स्पर्धा घेण्यावर मर्यादा आली असली, तरी सरावात खंड पडता कामा नये, तो चालूच राहिला पाहिजे. त्यासाठी आॅनलाइन पद्धतीने नवोदित खेळाडूंना शिकविण्याबरोबरच स्वत: सराव करण्यावर भर देत आहे. फिटनेसकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
- पूर्वा मॅथ्यू, राष्ट्रीय
ज्युदो खेळाडू, डोंबिवली

Web Title: Break the marathon, beat other competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.