ऑर्केस्ट्रा बारच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:35 PM2021-09-22T22:35:23+5:302021-09-22T22:38:41+5:30
Illegal construction of orchestra Bar : बारचे पहिल्या मजल्याचे वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई प्रस्तावित होती.
मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेने बुधवारी पोलीस बंदोबस्त भाईंदर पूर्वेच्या प्राईम ऑर्केस्ट्रा बारच्या अनधिकृत बांधकाम वर तोडक कारवाई केली. भाईंदर पूर्वेस प्रभाग समिती क्र. ३ अंतर्गत फाटक मार्गावर महावीर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये प्राईम ऑर्केस्ट्रा बार चालवला जात आहे. परंतु सदर बारचे पहिल्या मजल्याचे वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई प्रस्तावित होती.
सदर अनधिकृत बांधकामावर बुधवारी आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत कारवाई केली गेली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, नवघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण आदींसह पालिका व पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी कारवाई वेळी उपस्थित होते. पोकलेनच्या सहाय्याने सदरचे वाढीव अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.
उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला आहे. बैठकीत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, गॅरेजेस, पदपथावरील व्यावसायिक, अनधिकृत होर्डिंग्ज, अनधिकृत झोपड्या यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.