स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये ३२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:25 AM2018-05-16T03:25:40+5:302018-05-16T03:25:40+5:30
महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के असून दर ३० महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
मीरा रोड : महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के असून दर ३० महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा आजार जरी गंभीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास आणि योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्णपणे बरा होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०२२ पर्यंत दरवर्षी शहरी भागातील दीड लाख महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडणार असल्याचा अंदाज आहे.
या आकडेवारीत ग्रामीण आणि दुर्गम भागांतील महिलांचा समावेश नाही. नियमितपणे शारीरिक तपासणी केल्यास कॅन्सरचे प्रमाण आणि परिणामी मृत्यूचे प्रमाणदेखील कमी होईल, अशी माहिती स्तनकर्करोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती अग्रवाल यांनी जागतिक मातृदिनानिमित्त आयोजित कार्यक्र मप्रसंगी दिली.
सोशल मीडियावर मातृ दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला असला, तरी आपल्या आईला अथवा नात्यातल्या महिलेला भविष्यात कर्करोग होऊ नये, यासाठी आपण जागरूक नाही. आरोग्याविषयी असलेली अनास्थाच याला कारणीभूत आहे. आपण जेव्हा आजारी पडू तेव्हा बघू या, या अविचारी मानसिकतेमुळे अनेक महिला कर्करोगाला बळी पडत आहेत. त्या अनुषंगाने महिलांमध्ये याबाबत जागृती आणण्यासाठी ‘मॉम्स आॅफ इंडिया’ या फेसबुकवरील ग्रुपच्या माध्यमातून ३०० महिलांसाठी एक मार्गदर्शन शिबिर रविवारी मीरा रोड येथे आयोजित केले होते.
यावेळी सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारसुद्धा उपस्थित होते. यावेळी आई आणि मुलींचा एकत्रित फॅशन शो आयोजित केला होता.
>नवजात बालकाच्या काळजीचे प्रशिक्षण
डॉ. शेख यांनी नवजात बालकांची कशी काळजी घ्यावी, याबाबत उपस्थित मातांना वैद्यकीय मार्गदर्शन केले. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत विधिवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र ती जन्म देणाºया मातेचीच जबाबदारी आहे, असेच मानले जाते. मातेनेच त्या बाळासाठी कष्ट उपसायचे आणि वडिलांनी फक्त शाळेत जाताना मुलाला आपले नाव द्यायचे, असा समाज आणि समजही आहे, असे म्हणता येईल, अशी खंत डॉ. शेख यांनी व्यक्त केली.जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे ज्ञान येते तसेच अंधश्रद्धा आणि चुकीच्या पद्धतीदेखील येत असतात. या पद्धती चुकीच्या आहेत, याची माहिती नव्या पिढीला असायला हवी. विशेषत: ग्रामीण भागामध्ये अशा गैरसमजुती मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे बाळाच्या आणि मातेच्याही जीवाला धोका होऊ शकतो, याची जाणीव आपणास असली पाहिजे, असे मत रवी हिरवाणी यांनी उपस्थितांसमोर मांडले.