नगरसेवकांच्या विकासकामांना धाप; केडीएमसीची निवडणूक तोंडावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:00 AM2020-10-10T01:00:24+5:302020-10-10T01:00:35+5:30
निधी न मिळाल्याने आंदोलनाचा इशारा
कल्याण : केडीएमसीतील सदस्यांची मुदत ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत असून यंदा नगरसेवकांची विकासकामे सुरूच झालेली नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता आहे. भाजप आ. रवींद्र चव्हाण व विरोधी पक्षनेते राहुल दामले यांनी शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही कैफियत मांडली. नगरसेवकांनी सुचवलेली विकासकामे तातडीने सुरू केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
मनपाचा अर्थसंकल्प अलीकडेच मंजूर करण्यात आला. मात्र, त्यात मंजूर केलेली नगरसेवकांची विकासकामे अद्याप सुरू केलेली नाहीत. ही कामे करण्याबाबत एक संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, अद्याप बैठक झालेली नाही. अर्थसंकल्प मंजूर होऊन एक महिना झाला, तरी त्याची पुस्तिका तयार नाही. २०१५ मध्ये मनपात नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांची मुदत ११ नोव्हेंबरला संपत आहे. त्यास केवळ एक महिना शिल्लक राहिला, तरी नगरसेवकांची कामे होत नसतील, तर सर्व नगरसेवकांच्या वतीने १२ आॅक्टोबरला आंदोलन करण्यात येईल, असे दामले म्हणाले.
आर्थिक गाडी घसरली
मनपाची आर्थिक स्थिती २०१७ पासून बिघडली आहे. तत्कालीन आयुक्त पी. वेलारासू यांनी आर्थिक वस्तुस्थितीदर्शक अहवाल महासभेत मांडला होता. त्यावेळी खर्च आणि उत्पन्न यात ३०० कोटींची तफावत होती. गेल्या तीन वर्षांत आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे मनपाने कोरोनावर मात करण्यासाठी सगळी ताकद खर्च केली. कोरोनामुळे नवी विकासकामे हाती घेतली जाणार नाहीत, असे आयुक्तांनी अर्थसंकल्पाच्या वेळी स्पष्ट केले होते.