वाहन परवाना देण्यासाठी लाच, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 11:44 PM2019-02-11T23:44:40+5:302019-02-11T23:45:02+5:30
ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) शिकाऊ वाहन परवाना मिळवून देण्यासाठी एका वीसवर्षीय तरुणाकडे विटावा येथील किशोर याने ७ फेब्रुवारी रोजी अडीच हजार रुपयांची मागणी केली.
ठाणे : आरटीओ कार्यालयातून शिकाऊ वाहनचालक परवाना मिळवून देण्यासाठी तीन हजारांची मागणी करून १२०० रुपये स्वीकारणाऱ्या किशोर जैन (५३, रा. विटावा, ठाणे) आणि समीर काझी (३४, रूपादेवीपाडा क्रमांक-२, वागळे इस्टेट, ठाणे) दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. याच कार्यालयात पाठोपाठ दुसरी कारवाई करुन आणखी एका लाचखोर एजंटला अटक करण्यात आली.
ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) शिकाऊ वाहन परवाना मिळवून देण्यासाठी एका वीसवर्षीय तरुणाकडे विटावा येथील किशोर याने ७ फेब्रुवारी रोजी अडीच हजार रुपयांची मागणी केली. त्याचा साथीदार काझी यानेही तीन हजारांची मागणी केली. फोनवरून झालेल्या या संभाषणाचे तरुणाने रेकॉर्डिंग केले. ते ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊन त्याबाबत तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १२०० रुपयांची लाच स्वीकारताना जैन आणि काझी यांना अटक केली.
दुसºया कारवाईत, चालकपरवाना काढून देण्यासाठी अडीच हजारांची लाच स्वीकारणाºया आरटीओ कार्यालयातील दलाल समीर जाधव (२६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ठाण्यातील तरुणास त्याने वाहनचालक परवान्यासाठी अडीच हजारांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
लाचखोर तलाठी, लिपिक एसीबीच्या जाळ्यात
कल्याण : जमिनीच्या फेरफाराची माहिती देण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी शंकर साळवी (३८, रा. कल्याण) आणि लिपिक नितीन पाटील (३५, रा. कल्याण) या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. साळवी याने या कामासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली होती.