बनावट दागिन्यांद्वारे कर्ज घेऊन १० लाख ५० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:42 AM2019-07-30T00:42:52+5:302019-07-30T00:42:56+5:30
ठाण्यातील पतसंस्थेने दोन : सोनारांसह कर्जदाराविरुद्ध केला गुन्हा दाखल
ठाणे : बनावट दागिन्यांच्या आधारे सात लाख ६० हजारांचे सोने तारण कर्ज काढून १० लाख ५० हजारांची परतफेड न करणाऱ्या कौशल मिश्रा (रा. सुभाषनगर, ठाणे) याच्यासह तिघांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुभाषनगर येथील रहिवासी असलेल्या मिश्रा याने ३ जुलै २०१५ ते २७ जुलै २०१९ या कालावधीमध्ये ठाण्यातील जे कबुरचंद ज्वेलर्सचे सुरेश गुंगलिया आणि त्यांचा मुलगा हार्दिक गुंगलिया (रा. विठ्ठल मंदिर ट्रस्ट बिल्डिंग, ठाणे) यांच्याशी संगनमत करून एक ग्रॅम फार्मिंगचे दागिने ठाण्यातील महात्मा फुले को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेचे विजय कांबळे यांच्याकडे कर्जासाठी गहाण ठेवले. ते गहाण ठेवताना त्यांनी सोने परीक्षणाचे खोटे प्रमाणपत्र देऊन या संस्थेकडून सात लाख ६० हजारांचे सोनेतारण कर्जही ३ जुलै २०१५ रोजी घेतले.
कर्जाची परतफेड न करता कर्जाची मुद्दल, कर्जावरील व्याज, दंड आणि इतर खर्च असे १० लाख ५० हजारांची रक्कम परतफेड न करता फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या पतसंस्थेचे कांबळे यांनी कर्जदार कौशल मिश्रा तसेच सुरेश गुंगलिया आणि हार्दिक गुंगलिया अशा तिघांविरुद्ध २७ जुलै २०१९ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कसून चौकशी करत असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.