कल्याण खाडीवरील पुलाची डेडलाइन हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:23 AM2018-05-30T01:23:55+5:302018-05-30T01:23:55+5:30
कल्याण-भिवंडी मार्गावर कल्याण खाडीवरील दुर्गाडी सहापदरी पुलाचे काम मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते लांबले आहे.
कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गावर कल्याण खाडीवरील दुर्गाडी सहापदरी पुलाचे काम मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते लांबले आहे. त्यामुळे हा पूल आता मे २०१९ मध्ये पूर्ण होईल, असे एमएमआरडीएने कळवले आहे. पुलाची डेडलाइन वाढल्याने आणखी वर्षभर वाहनचालक व प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.
कल्याण खाडीवरील सहापदरी नव्या पुलाचे काम सप्टेंबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, त्यापूर्वीच मार्च २०१६ मध्ये कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला. हे काम १० मार्च २०१८ पर्यंत २४ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ही मुदत उलटली, तरी काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी फडणवीस आणि एमएमआरडीएकडे करण्यात आलेल्या होत्या. शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी तक्रारीत कामाच्या दिरंगाईची कारणे विचारली होती. हा पूल उभारणाऱ्या कंत्राटदाराकडून अन्य पुलांच्या कामातही अशा प्रकारची चालढकल सुरू आहे. त्यामुळे त्याच्याकडून एकतर वेळेत काम पूर्ण करून घ्यावे, अथवा काम रद्द करून नवीन कंत्राटदार नेमावा, अशी मागणी पाटील यांनी केली होती. एमएमआरडीएने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, कार्यादेश दिल्यावर कंत्राटदाराने प्राथमिक सर्वेक्षण, पुलाचे संकल्पचित्र आदी तयार केले. त्यानुसार, त्याला मंजुरी दिली. परंतु, पावसाळ्यात काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे चार महिन्यांनंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने नेव्हिगेशन स्पॅनच्या दोन स्पॅनच्या लांबीमध्ये व उंचीत वाढ करण्याचे सुधारित आदेश दिले. त्यानुसार, खाडीच्या मध्यभागी टाकण्यात येणाºया गाळ्यांची रचना बदलावी लागली. या नव्या रचनेस १२ जून २०१७ ला मंजुरी दिली गेली. पुलाच्या संकल्पनेत व उभारणीच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागला. त्यात बराच कालावधी गेला. नियोजन व आखणी नव्याने करावी लागली.