नाल्यावरील पूल रखडला
By admin | Published: January 30, 2017 01:56 AM2017-01-30T01:56:05+5:302017-01-30T01:56:05+5:30
अंबरनाथ पालिकेच्या बहुचर्चित फातिमा रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे
अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या बहुचर्चित फातिमा रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. या पुलाचे काम सुरू झाले असून वीजवाहिन्यांचे स्थलांतर न झाल्याने या कामात अडचणी येत आहे. या वाहिन्यांच्या स्थलांतरणाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी पालिकेने करूनही ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या पुलाचे काम रखडले आहे.
अंबरनाथ पोलीस ठाणे ते फातिमा शाळेपर्यंतच्या ३ कोटी ५० लाखांच्या काँक्रिट रस्त्याचे आणि त्याअंतर्गत असलेल्या मुख्य नाल्यावरील पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, नाल्यावरील पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
एक महिना होऊनही हे काम संथगतीने सुरू आहे. कंत्राटदाराने या कामादरम्यान पुलाखालून जाणाऱ्या जल आणि वीजवाहिन्या स्थलांतरित करून त्या पुलाच्या कोपऱ्यावरून टाकण्यासाठी पाठपुरावा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपली जलवाहिनी स्थलांतरित केली. मात्र, महावितरण विभागाची भुयारी वीजवाहिनी अद्याप स्थलांतरित झालेली नाही.
वीजवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी येणारा खर्चदेखील भरलेला आहे. पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदारामार्फत सतत पाठपुरावा करूनही ते काम करण्यास महावितरण चालढकल करत आहे. खर्च दिल्यावर तरी किमान काम लवकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ते काम होत नसल्याने पालिका प्रशासन महावितरणपुढे हतबल झाले आहे.
महावितरणच्या या मनमानी कारभाराला चोख उत्तर देण्याची तयारी पालिका प्रशासन करत आहे. मुदतीत वीजवाहिन्या न हलवल्यास त्या निकामी करून पालिका प्रशासन पुलाचे काम करणार आहे. कोहोजगावाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने तो रस्ता जास्त काळ बंद ठेवणे वाहतुकीच्यादृष्टीने सोयीचे नाही. कंत्राटदाराने हे काम लवकरात लवकर करून देण्याची हमी दिली असली, तरी आता वीजवाहिन्यांच्या स्थलांतरणाअभावी हे काम संथगतीने सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत स्थलांतरणाचे काम न झाल्यास हे काम बंद करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आता हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी महावितरणला अंतिम मुदतीचे पत्र देणार आहे.
२७ डिसेंबरला या पुलाच्या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आला. या वाहिन्या सोडून इतर कामांना सुरुवात करण्यात आली. वाहिन्या हलवण्याचे काम झाल्यावर तत्काळ काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे. तसेच या वाहिन्या हलवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता पालिका घेत आहे. सहकार्याची भूमिका घेऊनही महावितरण विभाग हे काम करत नाही.
ज्या पद्धतीने या वाहिन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न आहे, तसाच प्रश्न खांब स्थलांतर करण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण केलेले असले तरी खांब अद्याप स्थलांतरित झालेले नाही. याच रस्त्यावर नाना पाटील प्राइड कॉम्प्लेक्ससमोरील ट्रान्सफॉर्मर अद्याप स्थलांतरित न झाल्याने या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढलेली आहे. (प्रतिनिधी)