पूल तोडल्याने होते प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:35 PM2019-06-20T23:35:58+5:302019-06-20T23:36:10+5:30
आसनगाव स्थानकातील परिस्थिती; जुन्या पुलाच्याच जागी नवीन पूल बांधण्याची मागणी
आसनगाव : रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरांतील स्थानकांमध्ये झालेल्या पूल दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या पुलांच्या जागी नवीन पुलांची उभारणी सुरू केली आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा स्थानकांदरम्यानच्या आसनगाव स्थानकातील ब्रिटिशकालीन जुना पूल सुरक्षेच्या कारणास्तव तोडला आहे. मात्र, त्या जागी नवीन पुलाचे कोणतेही नियोजन नसताना जुना पूल तोडल्याने पूर्वेकडील हजारो प्रवाशांची विशेषत: वृद्ध, अपंग, शाळकरी मुलांची स्थानक आणि फलाट गाठताना मोठी दमछाक होते आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्याच जागी नवीन पूल बांधावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
काही रेल्वेस्थानकांबाहेरील पादचारी पूल कोसळण्याच्या घटनेनंतर धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यान असलेल्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी शहापूर तालुक्यातील पहिलेवहिले ‘ग्रीन स्थानक’ म्हणून घोषित झालेल्या आसनगाव रेल्वेस्थानकातील कसारा बाजूकडील जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पूल सुरक्षेच्या कारणास्तव तोडण्यात आला आहे. मात्र, त्या जागी नवीन पुलाचा कोणताही प्रस्ताव वा नियोजन नसताना जुना पूल तोडल्याने पूर्वेकडील हजारो प्रवाशांची विशेषत: वृद्ध, अपंग, शाळकरी मुलांची स्थानक गाठताना मोठी दमछाक होत आहे.
आसनगाव रेल्वेस्थानकातून दररोज ९० हजार प्रवासी विविध कामांसाठी कल्याण-ठाणे-मुंबईकडे प्रवास करतात. ग्रामीण भाग असल्याने भाजीपालाविक्रेते, दूधविक्रेते, चाकरमानी ठाणे-कल्याणला जातात. मात्र, शहापूरकडून आसनगाव स्थानकाकडे येताना प्रवाशांना फलाट गाठण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागते आहे. पर्यायी मार्ग म्हणून आसनगाव स्थानकात नव्याने बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती ठिकाणचा मोठा पूल हा जास्त उंचीचा असून तो चढताना विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, रु ग्ण, शेतकरी, चाकरमानी, दुग्ध व्यावसायिक, मालवाहतूक करणारे प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
या नवीन पुलाला पूर्वेकडे स्वयंचलित जिना (एस्कलेटर) असणे गरजेचे असताना येथे ही सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवासी हतबल झाले आहेत. तसेच सदर पर्यायी पूल हा रिक्षा स्टॅण्ड तसेच पार्र्किं गच्या ठिकाणापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे प्रवाशांना दुसरा पर्यायच नाही. परिणामी, निम्म्याहून अधिक प्रवासी शॉर्टकटचा अवलंब करून आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत फलाट गाठताना दिसतात. त्यामुळे मध्य रेल्वेने जुना पूल तोडला असला, तरी जुन्या ठिकाणीच नवीन पूल बांधण्याचे काम ताबडतोब सुरू करावे. तर रेल्वे प्रशासनाने आधी नवीन पूल उभारून नंतरच जुना पूल तोडायला हवा होता, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
जुना पूल तोडण्यापूर्वी आम्ही एक नवीन पूल कल्याण दिशेला २०१८ मध्ये बनवला असून दुसरा पूल कसारा दिशेला रेल्वे कॉलनीकडे आहे. सध्याच्या परिस्थितीत असे दोन पूल आसनगाव स्थानकात आहेत.
- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे