विठ्ठलवाडी स्थानकात पुलाचे प्लास्टर पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:24 AM2017-12-28T03:24:21+5:302017-12-28T03:24:24+5:30
डोंबिवली : रेल्वेस्थानकातील पादचारी पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच विठ्ठलवाडी स्थानकातील पुलाचे प्लास्टर बुधवारी सकाळी पडले.
डोंबिवली : रेल्वेस्थानकातील पादचारी पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच विठ्ठलवाडी स्थानकातील पुलाचे प्लास्टर बुधवारी सकाळी पडले. या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नसली, तरी प्रवाशांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये प्रवाशांचे बळी गेले होते. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत तातडीने पादचारी पुलांचे आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आॅडिटमध्ये झालेल्या पाहणीनंतरही डोंबिवलीपाठोपाठ विठ्ठलवाडी स्थानकातील पुलाचे प्लास्टर पडल्याने आॅडिटवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रेल्वेच्या आॅडिट समितीने अहवालात सुधारणा वा सूचना केल्या आहेत, हे सर्वसामान्य प्रवाशांना समजेल का? त्यासाठी कोणाकडे पाठपुरावा करायचा, असे प्रश्न प्रवाशांनी विचारले आहेत.
डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील गंजलेल्या पादचारी पुलाची छायाचित्रे चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याची दखल घेत मनसेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेत याबाबत दखल घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यापाठोपाठ विठ्ठलवाडी स्थानकातील ही घटना समोर आल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याची टीका करण्यात आली.