कोलशेत पाईप लाईन रोडजवळील खाडी बुजविण्याचे काम
By अजित मांडके | Published: June 24, 2024 04:55 PM2024-06-24T16:55:26+5:302024-06-24T16:57:43+5:30
याठिकाणी राडरोड्याचा भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात आहे. याठिकाणी सध्या याच कांदळवनावर गॅरेज, शाळा उभारल्या गेल्याचे भयावह चित्र दिसत आहे.
ठाणे : एकीकडे डेब्रीज हटविण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मोहीम हाती घेतली आहे. तसेच पथके देखील नेमली आहेत, परंतु असे असतांना कोलशेत पाईप लाईन रोडवर चक्क भराव टाकून खाडी बुजविण्याचे काम सध्या राजरोसपणे सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी राडरोड्याचा भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात आहे. याठिकाणी सध्या याच कांदळवनावर गॅरेज, शाळा उभारल्या गेल्याचे भयावह चित्र दिसत आहे. तर पाईप लाईनच्या दुसºया बाजूला चक्क टर्फ उभारण्यात आला आहे. परंतु याची साधी भनक पालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाने नसल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.
ठाण्यातील विविध मोकळ्या ठिकाणांवर रात्री अपरात्री राडरोडा टाकला जात आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही दिवसांपूर्वी संबधीत विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रभाग समितीनिहाय अशा ठिकाणांवर पथके नेमण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर महापालिका अधिकाºयांच्या म्हणन्यानुसार तशी पथके नेमली गेली आहेत. मात्र कोलशेत भागात पाईप लाईन रोडवर कुठेही तशा प्रकारचे पथक आढळून आले नाही. याठिकाणी मागील काही महिन्यापासून खाडी किनाºयावर कांदळवनात राडरोड्याच्या माध्यमातून भराव टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. या रस्त्याच्या सुरवातीलाच एक गॅरेज उभारले गेले आहे. पुढे एक शाळा देखील सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्याही पुढे गेल्यानंतर आणखी एक गॅरेज राजरोसपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्यात आणखी पुढील बाजूस खाडीतच भराव टाकण्यात येऊन येथील प्रवाह बदलण्याचे काम केले जात असल्याचे दिसत आहे. येथे कांदळ वनाची देखील कत्तल झाल्याचे दिसत आहे. येथील जवळ जवळ एक एकरहून अधिकचा परिसरावर राडरोडा टाकून तेथील परिसर सपाट करण्यात आला आहे. परंतु महापालिकेचे अद्यापही याकडे लक्ष गेले नसल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
पाईप लाईनच्या दुसऱ्या बाजूला अनाधिकृत बांधकामे उभी राहत असून याठिकाणी एक भला मोठा टर्फ देखील उभारला गेला असून त्याठिकाणी रात्रीच्या अंधारात क्रिकेट आणि फुटबॉलचे सराव सुरु असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली. परंतु हे सर्व कोणाच्या आर्शिवादाने आणि कृपेने सुरु आहे. याचे उत्तर महापालिकेकडे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त सौरभ राव यावर काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संदर्भात सहाय्यक आयुक्तांशी चर्चा करुन परिस्थिती तपासून पुढील कारवाई प्रस्थापित केली जाईल, असं ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग उपायुक्त गजानन गोदेपुरे म्हणाले.