बायोमेट्रीक हजेरीचा सावळा गोंधळ
By Admin | Published: January 13, 2017 06:40 AM2017-01-13T06:40:43+5:302017-01-13T06:40:43+5:30
कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक
कल्याण : कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक हजेरीची प्रणाली येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या प्रणालीत तशी सुविधा नाही. त्यामुळे कामावर हजर राहूनही बायोमेट्रीकमध्ये गैरहजर म्हणून नोंदी झाल्याचा धक्कादायक प्रकार सुरक्षा कर्मचाऱ्यांबाबत घडला आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मासिक वेतनावरही झाला आहे. परिणामी, या प्रणालीतील सावळ्या गोंधळामुळे ते पुरते हैराण झाले आहेत.
२००६ मध्ये तत्कालीन आयुक्त आर.डी. शिंदे यांनी बायोमेट्रीक हजेरी सुरू केली होती. त्यावेळी २२ लाख ५७ हजार रुपये खर्च करून ६६ बायोमेट्रीक यंत्रे लावण्यात आली. परंतु, कर्मचाऱ्यांनी सिगारेटचे चटके देऊन, दाभणासारखी टोकदार साधने, सुटी नाणी मशीनमध्ये टाकून असे एक नाअनेक प्रताप करून ही यंत्रे नादुरुस्त केली होती.
सध्याचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी केडीएमसीत पदभार स्वीकारल्यानंतर ठिकठिकाणी हजेरी शेडना भेटी दिल्या. त्यावेळी कर्मचारी कामावर नसल्याचे तसेच अनेकजण घरी बसून पगार घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी प्रणाली त्यांनी पुन्हा सुरू केली आहे. त्यासाठी १४० मशीन महापालिकेचे मुख्यालय, प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, अग्निशमन केंद्रे येथे ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मागील अनुभव पाहता यंत्रांचे कोणीही नुकसान करू नये, म्हणून मशिन्सच्या बाजूला सीसीटीव्ही बसवले आहेत.
बायोमेट्रीक यंत्रातील हजेरीच्या नोंदीवर मासिक वेतन निघत आहे. मात्र, ही प्रणाली सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिफ्टमध्ये काम करावे लागते. परंतु, एखाद्या शिफ्टची जबाबदारी असलेला कर्मचारी न आल्यास त्याला सलग दोन शिफ्टमध्ये काम करावे लागते. काहींना वेळप्रसंगी तीन ते चार शिफ्टमध्ये सलग काम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. अन्य विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम काही ठरावीक तासांचे असते. त्याप्रमाणे सुविधा प्रणालीत कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, सुरक्षारक्षकांना कराव्या लागत असलेल्या शिफ्ट आणि त्यानंतर करावे लागत असलेल्या अतिरिक्त कामाची नोंद होण्याची सुविधा या बायोमेट्रीक हजेरी प्रणालीत नाही. याचा फटका सुरक्षा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना बसला आहे. (प्रतिनिधी)