ठामपाच्या अग्निशमन दलात दिसणार महिला ब्रिगेड, देशातील पहिलीच महापालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 03:01 AM2019-12-05T03:01:24+5:302019-12-05T03:01:36+5:30
ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून येथे नव्याने इमारतींचे इमले उभे राहत असून मॉल संस्कृती झपाट्याने वाढू लागल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न गहन होऊ लागला आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता ४३५ पदांची भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात २५० पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे ८१ महिलांचीही भरती केली जाणार आहे. यासंदर्भातील जाहिरात येत्या १५ दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत. अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून येथे नव्याने इमारतींचे इमले उभे राहत असून मॉल संस्कृती झपाट्याने वाढू लागल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न गहन होऊ लागला आहे. मागील वर्षभरात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीसुद्धा वित्तहानी अधिक झालेली आहे. वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाला ठाणे अग्निशमन दल अपुरे पडू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिव्यातील अग्निशमन केंद्र सुरू केले आहे.
१५ दिवसांत देणार भरतीची जाहिरात
विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्यानुसार, आता विविध खात्यांत पदांची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आता ठाणे अग्निशमन दलात ४३५ पदांची भरती ही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यानुसार, आता २५० च्या आसपास पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये महिलांना खास ३० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर आयुक्तांनी स्वाक्षरी केलेली असून त्याची जाहिरात येत्या १५ दिवसांत काढली जाणार आहे. त्यानंतर, इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर, पुढील चार महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानुसार, ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. आता या फायरमन महिलांनादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळणार आहे.
येथे होणार नवी अग्निशमन केंद्रे
भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि शहराचा होणारा विस्तार पाहता, ठाणे महापालिकेने नितीन कंपनी, ओवळा, देसाईगाव, कोलशेत, कळवा हॉस्पिटलजवळ, वर्तकनगर, व्होल्टास, डायघर आणि पारसिक या नऊ ठिकाणी नव्याने अग्निशमन केंदे्र सुरूकरण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला २७ सप्टेंबर २०११ रोजी मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, सध्याच्या अग्निशमन केंद्रांसाठी ४३५ च्या स्टाफची गरज आहे.
ठाणे महापालिका हद्दीत
सात अग्निशमन केंद्रे
ठाणे महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने १९९१ मध्ये अग्निशमन केंद्रासाठी लागणारा कर्मचारीवर्ग आणि भविष्यात वाढणाºया लोकसंख्येच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, आज लोकसंख्या २२ लाखांवर गेली असली, तरी कर्मचाºयांचा स्टाफ हा ३४० एवढाच आहे. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांवर अधिक कामाचा ताण पडत असून त्यांना नव्या अत्याधुनिक यंत्रणांचा सराव नसल्याने त्यांची कुमक आग विझवण्याच्या ठिकाणी कमी पडत आहे. सध्या ठाणे महापालिका हद्दीत सात अग्निशमन केंद्रे असून त्यामध्ये एकूण ३४० अधिकारी, कर्मचारीवर्गाचा स्टाफ आहे. पर्यवेक्षक, तांडेल, वाहनचालक आणि फायरमन यांची कित्येक पदे रिक्त आहेत. त्याचा शुभारंभ अद्याप झालेला नाही. प्रत्यक्षात एका अग्निशमन केंद्रासाठी तीन पाळ्यांमध्ये ३२ अधिक सहा असे ३८ कर्मचाºयांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. परंतु, सध्या प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाची वानवा असल्याचे दिसत आहे.