मुंब्य्रात अतिक्रमण विभागाच्या कारवाईत ६४० स्टॉल व ४५ गाळ्यांवर बुल्डोझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:46 PM2019-01-22T16:46:43+5:302019-01-22T16:48:13+5:30
मुंब्य्रातील स्टेशन परिसर ते वाय जंक्शन पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ६४० स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले.
ठाणे - मागील काही दिवस मुंब्रा भागात सुरु असलेल्या कारवाईचा वेग आता आणखी वाढला आहे. मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: कारवाईसाठी या भागात उतरले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्र मण निष्कासन विभागाच्या विविध सात पथकांच्या साहाय्याने मुंब्रा येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये गुलाब मार्केटसह जवळपास ६४० स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशन ते वाय जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूंनी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सर्व उपायुक्तांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांचा समावेश असलेली सात विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांच्या साहाय्याने सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून कारवाईला सुरूवा झाली. या कारवाईमध्ये संपूर्ण गुलाब मार्केट जमीनदोस्त करण्याबरोबरच एकूण ६४० रस्त्यावरील स्टॉल्स बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर एमएम व्हॅली, अमृतनगर, बॉम्बे कॉलनी या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जवळपास ४५ व्यावसायिक गाळे तोडण्यात आले.
उपायुक्त (अतिक्र मण व निष्कासन) अशोक बुरपल्ले यांच्या समन्वयातून उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप, शंकर पाटोळे, महेश आहेर यांच्या पथकांनी ही कारवाई ८ जेसीबी, १० डंपर आणि जवळपास २०० कामगारांनी पोलिस बंदोबस्तात पूर्ण केली.