संसदेत मराठा आरक्षण विधेयक आणा - खासदार राजन विचारे
By धीरज परब | Published: November 3, 2023 07:43 PM2023-11-03T19:43:30+5:302023-11-03T19:44:05+5:30
मराठा आरक्षणाबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे.
मीरारोड - राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकारला मराठा समाजास खरंच मनापासून आरक्षण द्यायचे असेल, तर महिला आरक्षण विधेयकप्रमाणे मराठा आरक्षण विधेयक संसदेत मांडून मंजूर करा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर येथील मराठा समाजाच्या आंदोलनात केली. मराठा समाजाच्या साखळी उपोषणास आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाईंदर पूर्वेच्या स्वातंत्र्य वीर सावरकर चौक येथे मीरा भाईंदरच्या सकल मराठा समाजाने मराठ्यांना आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी १ नोव्हेबंरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी खा. विचारे यांनी मराठा आंदोलनास भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , महिला संघटक स्नेहल सावंत सह दिनेश नलावडे , नीलम ढवण , लक्ष्मण जंगम, तेजस्विनी पाटील , जितेंद्र पाठक आदी सोबत होते .
मराठा आरक्षणाबाबतसंसदेत विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. याशिवाय धनगर, आदिवासी तसेच इतर जातीच्या आरक्षणाबाबत सुद्धा संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केल्याचे खा. विचारे यांनी सांगितले .