वाचलेली पुस्तके आणा, हवी ती उचलून न्या!
By संदीप प्रधान | Published: January 23, 2023 06:21 AM2023-01-23T06:21:27+5:302023-01-23T06:21:36+5:30
डोंबिवलीत लोक राहायला येण्यापूर्वी जेव्हा गिरगाव अथवा दादरला चाळीत वास्तव्य करीत होते, तेव्हा वृत्तपत्राचे आदान-प्रदान हे नैमित्तिक होते.
डोंबिवलीत लोक राहायला येण्यापूर्वी जेव्हा गिरगाव अथवा दादरला चाळीत वास्तव्य करीत होते, तेव्हा वृत्तपत्राचे आदान-प्रदान हे नैमित्तिक होते. एका घरात एक वृत्तपत्र येई, तर शेजारच्या घरात जाणीवपूर्वक दुसरे घेतले जात होते. दुपारी पेपरची अदलाबदल केली जात होती. हीच परंपरा दिवाळी अंकाबाबत होती. चाळीतील एकाच मजल्यावर वेगवेगळ्या घरात चार दिवाळी अंक घ्यायचे आणि वर्षभर हा साहित्यिक फराळ पुरवून पुरवून फस्त केला जायचा. डोंबिवलीत सेल्फ कंटेंट ब्लॉकमध्ये आल्यावर शेजाऱ्याचा चेहरा रविवारखेरीज दिसत नाही.
दिसला तरी हाय, हॅलोच्या पुढे फारशी गाडी सरकत नाही. समजा गेली तरी आता सगळे जग मोबाइलमध्ये सामावलेले असल्याने वृत्तपत्र आदान-प्रदान अशक्य. दिवाळीचा फराळ ऑर्डर देऊन आणण्याचा मोठा बदल पचवलेला असताना दिवाळी अंकापेक्षा मनोरंजनाकरिता ओटीटीच्या चटकदार फराळावर पिंड पोसला गेलाय हे वेगळे सांगायला नको.
याच डोंबिवलीत पै फ्रेण्ड्स लायब्ररीतर्फे गेली पाच वर्षे पुस्तक आदान-प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. २१ ते २९ जानेवारी या कालावधीत हा बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळा संपन्न होत आहे. पहिल्या वर्षी केवळ मराठी भाषेतील १७ हजार पुस्तकांची देवाण-घेवाण झाली. पै लायब्ररीचे सर्वेसर्वा पुंडलिक पै हे विदेशात फिरायला गेले असता तेथे त्यांनी सर्वप्रथम ही पुस्तकांची देवाण-घेवाण पाहिली. हीच संकल्पना डोंबिवलीत राबवण्याचा निर्णय घेतला. यंदा किमान दोन लाख पुस्तकांचे आदान-प्रदान होईल, अशी अपेक्षा आहे. मराठीखेरीज अन्य भाषिक हजारो पुस्तके जमा झाली आहेत. तुमच्या घरातील तुम्ही वाचलेली पुस्तके घेऊन यायचे व ती जमा करून जेवढी पुस्तके तुम्ही आणली तेवढीच दुसरी पुस्तके घेऊन जायची, अशी ही कल्पना आहे. तुम्ही आणलेले पुस्तक ५० रुपयांचे असले तरी तुम्हाला ५०० रुपयांचे पुस्तक घेऊन जाण्याची परवानगी आहे. याखेरीज नव्या कोऱ्या पुस्तकांची दालने आहेत. तेथील पुस्तक खरेदीवर चांगली घसघशीत सवलत आहे.
- जास्त पुस्तके झाली तर ती सरळ रद्दीत देऊन टाकण्याकडे कल पाहायला मिळतो. पुस्तकांचे खरे मोल हे चोखंदळ वाचक हाच ओळखू शकतो. पुस्तक आदान-प्रदान ही कल्पना उत्तम आहे.
- कथा, कादंबऱ्या, सस्पेन्स थ्रिलर, सहज उपलब्ध होणारे धार्मिक ग्रंथ ही पुस्तके वाचून झाल्यावर आपण दुसऱ्याला देऊ. परंतु दुर्मीळ व पुन्हा छपाई न होणारी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, चरित्रे, विशेषांक हे सहसा कुणी देणार नाही.
- लेखन करताना संदर्भाकरिता ते लागू शकते. त्यामुळे या उपक्रमालाही मर्यादा आहेत. परंतु खऱ्या वाचकाचे आपल्या पुस्तकावर मन जडलेले असते. त्यामुळे एका अर्थाने हे पुस्तकांचे नव्हे मनाचे आदान-प्रदान असते.