कर आकारणी, नळजोडणीसाठी मीरा भाईंदर महापालिकेत दलालांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:10+5:302021-03-18T04:40:10+5:30
मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेचे मालमत्ता कर आकारणी व नळजोडणीसाठीचे कार्यालय हे दलालांच्या विळख्यात सापडले आहे. याठिकाणी संबंधित ...
मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेचे मालमत्ता कर आकारणी व नळजोडणीसाठीचे कार्यालय हे दलालांच्या विळख्यात सापडले आहे. याठिकाणी संबंधित अधिकारी व दलालांच्या संगनमताने कर आकारणी, नळजोडण्या दिल्या जात असून प्रत्यक्ष अर्जदार गेल्यास त्याचे काम रखडवले जाते. दलालांच्या माध्यमातून मात्र कामे झटपट करून दिली जातात, असे आरोप होत आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेतील भ्रष्टाचार व गैरप्रकारांचे किस्से थांबता थांबत नाही आहेत. मालमत्ता कर आकारणीचे अधिकार प्रभाग अधिकारी व मुख्य कार्यालयातील मालमत्ता कर विभागास असून, नळ जोडण्या पाणीपुरवठा विभागामार्फत दिल्या जातात. परंतु महापालिकेचा मालमत्ता कर विभाग आणि पाणीपुरवठा विभाग हा दलालांच्या विळख्यात असून या कार्यालयांमध्ये कर आकारणी, नळ जोडणी आदी कामांसाठी मूळ अर्जदार क्वचितच दिसतात.
कर आकारणी व नळ जोडणीच्या फाइलींचा पाठपुरावासुद्धा हे दलालच करताना दिसतात. अधिकाऱ्यांच्या दालनात, तसेच कार्यालयातसुद्धा या दलालांचा राबता असतो. परंतु पालिका अधिकारी व कर्मचारीसुद्धा दलालांनाच प्रोत्साहन देत असतात. मूळ अर्जदार समोर येत नसताना अधिकारीसुद्धा कधी दलालांना अर्जदार कुठे आहे म्हणून विचारत नाहीत. ते नसले तरी दलालांच्या माध्यमातूनच कामे उरकली जातात. कर आकारणी व नळ जोडणीच्या फाईलींवर काही नगरसेवकांची व्हिजिटिंग कार्ड लावलेली असल्याचे प्रकारसुद्धा नवीन नाहीत.
वास्तविक मालमत्ता कर आकारणी, नळ जोडणी आदी कामांसाठी मूळ अर्जदारांनी अर्ज सादर करण्यापासून त्याची मंजुरी मिळेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. परंतु पालिका अधिकारी सामान्य अर्जदार असले की त्यांना खेपा मारायला लावतात. त्यातही सरकारी जमिनी, कांदळवन, सीआरझेड आदी क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना कर आकारणी, नळ जोडणी करू नका असे महसूल विभागाने वेळोवेळी महापालिकेला कळवले आहे. तरीही प्रभाग अधिकारी, कर विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनधिकृत बांधकामांना कर आकारणी करून नळ जोडण्या देतात. दलालांच्या माध्यमातून ही बहुतांश कामे केली जातात. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर आकारणी, नळ जोडण्या घेऊनसुद्धा पालिका अधिकारी गुन्हा दाखल करत नाहीत. नगरसेवकदेखील या गंभीर प्रकरणी काही काळ बोंब मारायचा कांगावा करतात.
.............
महापालिकेत कोणताही अधिकारी, कर्मचारी अर्जदाराऐवजी त्रयस्थ दलालांच्या माध्यमातून अशाप्रकारे मालमत्ता कर आकारणी, नळ जोडण्या आदी मंजूर करण्याची कामे करत असतील तर दलालांसह त्यांचीसुद्धा गय केली जाणार नाही. नागरिकांच्या अर्जांवर विनाविलंब कागदपत्रे पडताळून नियमानुसार कारवाई अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावी. दलालांना थारा देऊ नये.
दिलीप ढोले, आयुक्त