सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास अटक: दोन तरुणींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 10:08 PM2019-03-21T22:08:53+5:302019-03-21T22:17:26+5:30
चित्रपट आणि मालिकांमधील कनिष्ठ कलाकार तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्या मार्फतीने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल युनेस लॉरेन्स याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या धाडीनंतर दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून त्याच्याकडून एक कारही जप्त करण्यात आली आहे.
ठाणे : मालिका तसेच जाहिरातीसाठी मॉडेलिंगचे काम करणा-या कनिष्ठ कलाकार तरुणींना पैशाचे अमिष दाखवून सेक्स रॅकेट चालविणा-या युनेस लॉरेन्स (४१, रा. पटेलवाडी, मालाड, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या जांभळी नाका येथील ‘वैशाली हॉटेल’मध्ये युनेस हा काही मुलींना शरीर विक्रयाच्या व्यवसायासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार विजय पवार यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार अविनाश बाबरेकर, राजू महाले आणि हवालदार पवार यांच्या पथकाने सापळा लावून १९ मार्च रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १९ आणि २३ वर्षीय दोन पिडीत तरुणींची सुटकाही करण्यात आली. तसेच त्याची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. युनेसला यामध्ये मदत करणारा छायाचित्रकार पाली होळकर आणि कलाकारांचे मेकअप करणारी एक महिला अशा दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी युनेस याच्यासह तिघांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
.................................
असे ओढायचे तरुणींना जाळयामध्ये
युनेस हा मालिकांमधील कलाकार तरुणींचे मेकअप करणा-या अंजली वर्मा (नावात बदल) हिच्या संपर्कात होता. तर अंजली ही छायाचित्रकार पालीच्या संपर्कामध्ये होती. युनेस आणि अंजली हे दोघे गरजू, गरीब कलाकार मुलींना जाळयात ओढण्यासाठी त्यांना पैशाचे अमिष दाखवायचे. एखादी मुलगी तयार झाली तर तिच्यासाठी युनेस गि-हाईक शोधण्याचे काम करायचा. अंजली अशा मुलींना ‘तयार’ करुन ती युनेसकडे पाठवायची. एका मुलीसाठी पाच हजारांची रक्कम ठरली तर तर त्यातील तीन हजार हे तिघे वाटून घ्यायचे. उर्वरित रक्कम या मुलीकडे सोपविली जायची. अशाच दोन मुलींचा सौदा करण्यासाठी युनेस ठाण्याच्या जांभळी नाका येथील हॉटेलमध्ये आला. त्यावेळी पोलिसांनी पाठविलेल्या बनावट गि-हाईकांच्या जाळयात तो अडकला आणि पोलिसांनी दोन मुलींची त्याच्या ताब्यातून सुटका केली.