भिवंडीत भावाने केली व्यसनाधीन लहान भावाची हत्या, आईने दाखल केला हत्येचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 04:02 PM2017-10-12T16:02:19+5:302017-10-12T16:04:15+5:30
रागाच्या भरात व्यसनाधीन भावाला लाकडी दांडक्याने मारून त्याची हत्या केल्याने पोलिसांनी हत्या करणा-या भावास अटक केली आहे. परंतू दांडक्याने मारणा-या आपल्याच मुलाविरूद्ध तक्रार देण्याची पाळी त्यांच्या आईवर आल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.
भिवंडी : रागाच्या भरात व्यसनाधीन भावाला लाकडी दांडक्याने मारून त्याची हत्या केल्याने पोलिसांनी हत्या करणा-या भावास अटक केली आहे. परंतू दांडक्याने मारणा-या आपल्याच मुलाविरूद्ध तक्रार देण्याची पाळी त्यांच्या आईवर आल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.
आकाश तुकाराम माने(१९)असे मयत तरूण भावाचे नाव असून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. शहरातील नारपोली-देवजीनगरमध्ये शिवसेना शाखेजवळ तो एकत्र कुटुंबात राहत होता. मयत आकाश नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागून त्याच्या आईवडिलांना त्रास द्यायचा. तसेच व्यसनासाठी परिसरांतील लोकांशी नेहमी भांडण करणे व भुरट्या चो-या करणे अशा तक्रारीने त्याचे आईवडील व भाऊ वैतागले होते. काल रात्री आकाशने आपल्या घरात येऊन आई कौशल्या व वडील तुकाराम माने यांच्याकडे दारूपिण्यासाठी पैश्याची मागणी केली. त्यावरून आाईवडीलांसह त्याचा मोठा भाऊ सुनिल याच्याबरोबर त्याचे जोरदार भांडण झाले. त्यारागाने आकाश हा घराबाहेर पडला आणि रात्री दीड वाजताच्या सुमारास यंत्रमाग कारखान्यातून लाकडी मारदांडा घेऊन घरी आला आणि मोठा भाऊ सुनिल यांस मारदांड्याने मारू लागला. भावाभावांचे हे भांडण सोडविण्यासाठी वडील मध्ये पडले असता घराबाहेरील मोठा दगड घेऊन तो वडिलांच्या अंगावर धावून गेल्याने, सुनीलने त्याच लाकडी दांड्याने आकाशला डोक्यावर, मानेवर व कपाळावर बेदम मारहाण केली. त्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीने आकाशचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सुनिल माने हा नारपोली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आणि हकीकत सांगितली. मात्र आपला एक मुलगा मयत झाला असताना दुस-या मुलाविरोधात गुन्हा नोंद करण्याची वेळ त्याची आई कौशल्या तुकाराम माने यांच्यावर आली. त्यामुळे परिसरांतील लोकांनी हळहळ व्यक्त केली. पोलिसांना या प्रकरणी सुनिल माने यांस अटक केली आहे.