भावाने केली व्यसनाधीन भावाची हत्या : दारूसाठी आईवडिलांना द्यायचा त्रास, भिवंडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:05 AM2017-10-13T02:05:15+5:302017-10-13T02:05:28+5:30
रागाच्या भरात व्यसनाधीन भावाला लाकडी दांडक्याने मारून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली. आईवरच मुलाविरोधात तक्रार दाखल करण्याची वेळ आली.
भिवंडी : रागाच्या भरात व्यसनाधीन भावाला लाकडी दांडक्याने मारून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली. आईवरच मुलाविरोधात तक्रार दाखल करण्याची वेळ आली.
आकाश तुकाराम माने (१९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारूच्या आहारी गेला होता. नारपोली-देवजीनगरमध्ये शिवसेना शाखेजवळ तो कुटुंबासमवेत राहत होता. आकाश नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागून त्याच्या आईवडिलांना त्रास द्यायचा. तसेच व्यसनासाठी परिसरातील नागरिकांशी भांडण करणे, भुरट्या चोºया करणे अशा तक्रारीने त्याचे आईवडील व भाऊ त्रस्त झाले होते. बुधवारी रात्री आकाशने घरी येऊन आई कौशल्या व वडील तुकाराम माने यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. त्यावरून आईवडिलांसह त्याचा मोठा भाऊ सुनील याच्याबरोबर जोरदार भांडण झाले. त्या रागात आकाश हा घराबाहेर पडला आणि रात्री दीडच्या सुमारास यंत्रमाग कारखान्यातून लाकडी दांडा घेऊन घरी आला आणि मोठा भाऊ सुनील याला मारू लागला.
भावाभावांचे भांडण सोडवण्यासाठी वडील मध्ये पडले असता घराबाहेरील मोठा दगड घेऊन आकाश वडिलांच्या अंगावर धावून गेला. सुनीलने त्याच लाकडी दांड्याने आकाशला बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आकाशचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सुनील नारपोली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आणि सर्व प्रकार सांगितला. आईने सुनीलविरोधात तक्रार दिल्यावर पोलिसांनी सुनीलला अटक केली.