परिवहन समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
By admin | Published: June 16, 2015 03:18 AM2015-06-16T03:18:21+5:302015-06-16T03:18:21+5:30
दीड वर्ष रखडलेली परिवहन समितीची निवडणूक येत्या २० जून रोजी पार पडणार आहे. परंतु, त्यात सदस्य म्हणून जाण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.
ठाणे : दीड वर्ष रखडलेली परिवहन समितीची निवडणूक येत्या २० जून रोजी पार पडणार आहे. परंतु, त्यात सदस्य म्हणून जाण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. विशेष म्हणजे यात डावललेल्यांची आणि नाराजांची संख्या अधिक आहे. त्यातही या समितीत १२ सदस्य जाणार असल्याने ९ सदस्यांची निवड ही संख्याबळानुसार सुरळीतपणे पार पडणार आहे. उर्वरित ३ जागांसाठी भाजपा, मनसे आणि इतर घटक पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, यातून कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या निवडणुकीसाठी १७ जून रोजी अर्ज भरले जाणार आहेत. पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे ३ आणि काँग्रेसचा १ सदस्य परिवहनमध्ये जाणार आहे. परंतु, शिवसेनेतील ५ जागांसाठी अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चा वळविला आहे. यामध्ये नगरसेवक, स्वीकृत, वृक्ष प्राधिकरण, शिक्षण मंडळ आदींमध्ये आश्वासन देऊनही संधी न मिळालेल्यांची संख्या अधिक आहे. केवळ पाचच सदस्यांना संधी मिळणार असल्याने पुन्हा अनेक पदाधिकारी नाराज होणार आहेत. हीच परिस्थिती राष्ट्रवादीचीसुद्धा आहे. त्यांचे ३ सदस्य निवडून जाणार असले तरी आतापर्यंत २४हून अधिक जणांनी यासाठी भाऊगर्दी केली आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न श्रेष्ठींपुढे निर्माण झाला आहे. काँग्रेसही याबाबतीत पिछाडीवर नसून त्यांचा केवळ १ सदस्य परिवहनमध्ये निवडून जाणार आहे. मात्र, त्यांच्याकडेसुद्धा २२ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लावायची, हा पेच निर्माण झाला आहे. एकूणच तिन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने सर्वांनाच संधी देणे शक्य नसल्याने पुन्हा नाराजांची फळी उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे परिवहननंतर आता एकही समिती अथवा पालिकेत शिरण्याचा अन्य एकही मार्ग नसल्याने या नाराजांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा पेचही या पक्षांपुढे निर्माण झाला आहे.