समाजातील भावंडभाव हे साहित्यातून येण्याचा आग्रह आहे - रविंद्र गोळे
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 17, 2023 04:54 PM2023-12-17T16:54:01+5:302023-12-17T16:54:14+5:30
साहित्यिकातील कार्यकर्ता भाव जागरुक राहिला तर समाजाचे निरीक्षण आत्मियतेने करु शकतो.
ठाणे : साहित्यिकातील कार्यकर्ता भाव जागरुक राहिला तर समाजाचे निरीक्षण आत्मियतेने करु शकतो. जीवनाचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतील. या संदर्भाने सगळ्यांना जोडून घेण्याची भूमिका राहिली पाहिजे. तुटण्याची वेळ येऊ नये. यासाठी आत्मियतता, प्रेम यांचा आधार घ्यावा लागेल. समाजातील भावंडभाव हे साहित्यातून येण्याचा आग्रह आहे. समाज शक्तीशाली झाला तर राष्ट्रांतर्गत येणारे आव्हाने परतवू लावू शकू. मात्र ती संकटे दूर करण्यासाठी साहित्य या आयुधाचा वापर करताना राष्ट्रभाव आणि बंधुभाव प्रथम याचा विचार करावा लागेल. तसेच, आपल्याला भविष्यात कुठे जायचे याचा विचार साहित्यातून करावा लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, कोकण प्रांताच्यावतीने आयोजित 'प्रादेशिक साहित्यातील राष्ट्रीयत्व' या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गोळे यांनी केले.
रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे 'म.पां.भावे साहित्य नगरीत साहित्यातील राष्ट्रीयत्वाचा जागर झाला. यावेळी गोळे म्हणाले, शेवटी साहित्य हे भावभावनांचा अविष्कार असतात. बदलत्या समाजाचे प्रतिबिंब साहित्यात यावे. समाजाच्या बदलाचा वेग, स्पंदने साहित्याता कसा करावा याचा विचार करावा लागेल ते करताना आपल्या समोरच्या आव्हानांचा विचार करावा लागेल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले की, स्मार्ट फोन मुळे वाचन संस्कृती मागे पडली आहे. लहान मुलांच्या हातून आपल्याला फोन काढून घ्यावा लागेल. जुन्या नव्या लेखकांचे शब्द वाचकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर पुन्हा पुस्तके हाती आली पाहिजे. यावेळी प्रांतअध्यक्ष दुर्गेश सोनार, पद्मश्री रमेश पतंगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र प्रभुदेसाई, अ. भा. साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक साहित्य भारती, कोकण प्रांतचे कार्याध्यक्ष प्रविण देशमुख, प्रांतमंत्री संजय द्विवेदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.