दारु मागितली म्हणून भावांनी केली हत्या
By Admin | Published: May 22, 2017 01:57 AM2017-05-22T01:57:27+5:302017-05-22T01:57:27+5:30
पुन्हा दारु मागितली म्हणून झालेल्या वादात दोघा भावांनी एका मित्राची हत्या केली, तर दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी एकाला अटक केली आ
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : पुन्हा दारु मागितली म्हणून झालेल्या वादात दोघा भावांनी एका मित्राची हत्या केली, तर दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
गेली सात-आठ वर्षे मोलमजुरी करणारे नाका कामगार अशोक चौरसिया व कमलेश चौरसिया (दोघेही मूळ रा. आजमगढ, उत्तर प्रदेश), राजन अभिमान मेश्राम (३५, मूळ रा. अमरावती) व बिरजू हे चौघेही मित्र. दिवसभर मिळेल ते काम करायचे; पण रात्रीच्या वेळी मात्र मिळून दारु प्यायची, असा त्यांचा नित्यक्रम. मीरा रोडच्या शीतल नगरमधील गणपती मंदिराजवळील मैदानात अशोक, कमलेश व राजन हे तिघे शनिवारी रात्री दारु पीत बसले होते. काही वेळाने बिरजू आला व त्याने अशोककडे दारु मागितली. त्याने पुन्हा दारु मागताच बाचाबाची सुरु झाली. त्यात कमलेशने बिरजूच्या कानाखाली लगावल्याने राजन त्या भांडमात पडला. अशोकने राजनला शिवीगाळ सुरु केली. त्याला राजनने विरोध केला. त्याचा राग येऊन अशोकने जवळ पडलेला लाकडी वासा घेऊन राजनच्या डोक्यावर प्राणघातक प्रहार केला. कमलेशनेसुध्दा तोच वासा घेऊन राजनवर हल्ला केला.
बिरजू सोडवायला मध्ये पडला असता त्याच्या चेहऱ्यावर वासा घेत फटका लगावला. राजन व बिरजू रक्ताच्या थारोळ्यात पडताच अशोक तेथून पळून गेला, तर कमलेश परिसरातच घुटमळत थांबला.
मीरा रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक महेश कुचेकर व पोलिस कर्मचारी विजय ब्राह्मणे घटनास्थळी पोहचले. एका साक्षीदाराकडून माहिती मिळताच आजूबाजूला घुटमळत असलेल्या कमलेशला पोलिसांनी अटक केली. तर ते अशोकचा शोध घेत आहेत.