बीएसएनएलने थकवले महावितरणचे १५ लाख ६० हजारांचे बिल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:28 PM2019-03-05T18:28:31+5:302019-03-05T18:40:23+5:30
बीएसएनएल या केंद्र सरकारच्या कंपनीने महावितरणचे डोंबिवलीमधील पाच कनेक्शन मिळून १५.६० लाखांचे वीज बिल थकवले आहे. त्यामुळे महावितरणने त्यांची वीज कनेक्शन कापले आहेत.
डोंबिवली: बीएसएनएल या केंद्र सरकारच्या कंपनीने महावितरणचे डोंबिवलीमधील पाच कनेक्शन मिळून १५.६० लाखांचे वीज बिल थकवले आहे. त्यामुळे महावितरणने त्यांची वीज कनेक्शन कापले आहेत. परिणामी शहरातील हजारो ग्राहकांचे दुरध्वनी बंद पडले आहेत.
त्यामुळे ग्राहक त्रस्त असून आता काय करायचे हा मोठा पेच निर्माण झाला आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज दिक्कड यांनी दिलेल्या माहितीनूसार बीएसएनएलने गेल्या चार महिन्यांपासून वीज बिल भरणा न केल्याने नाईलाजास्तव हे पाऊल महावितरणला उचलावे लागले आहे. शहरातील मानपाडा स्टार कॉलनी, कोपर रोड, आनंदनगर यांसह टिळकनगर भागातील बीएसएनएलच्या कार्यालयामधून वीज बील भरणा न झाल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडीत केला आहे. या चार केंद्रामध्ये महावितरणच्या माध्यमातून ५ कनेक्शन मधून वीज पुरवठा केला जातो. चार महिने झाले बील थकवल्यासंदर्भात संबंधितांना नोटीसही बजावण्यात आली होती, परंतू त्यावर काहीही प्रतिक्रिया आली नाही की थकीत वीज बिलाची रक्कम भरण्यात आली. त्यामुळे चार महिन्यांचे मिळून १५ .६० लाखांचे एकूण बील झाल्यानंतर आम्हालाही वरिष्ठांकडून विचारणा होत असल्याने ही भूमिका घ्यावी लागली. मार्च महिना असून आमचेही ऑडिट होत असते, त्यात ही तफावत येणे ही गंभीर बाब वरिष्ठांनी निदर्शनास आणून दिली. त्यांच्याच आदेशांनूसार ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
दुरध्वनी बंद असल्याकारणे अनेकांनी ठिकठिकाणी दुरध्वनी कार्यालयात खेपा मारल्या, परंतू नेमकी माहिती ग्राहकांना न मिळाल्याने ग्राहक देखिल हवालदिल झाले आहेत. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे तांत्रिक अडचण उद्भवली असल्याच्या तर्क वितर्कांनाही उधाण आले आहे. परंतू महावितरण अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तूस्थिती सांगितली. त्यासंदर्भात बीएसएनएलएच्या विभागीय व्यवस्थापकांना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.