बसपा, रिपाइंच्या हाती भोपळा, ‘एमआयएम’ने उघडले खाते
By admin | Published: February 24, 2017 07:41 AM2017-02-24T07:41:50+5:302017-02-24T07:41:50+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षासह उपमहापौरपदावर डोळा ठेवणाऱ्या
राजू ओढे / ठाणे
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षासह उपमहापौरपदावर डोळा ठेवणाऱ्या रिपाइं (आठवले) च्या हाती ठाणेकरांनी भोपळा दिला. ‘एमआयएम’ने दोन जागा घेऊन खाते उघडण्यात अपेक्षित यश मिळवले.
२०१२ च्या महापालिका निवडणुकीत बसपाला २ जागांवर यश मिळाले होते. या दोन्ही जागा बसपाने गमावल्या आहेत. बसपा हा सध्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीकडे पक्षाने साफ दुर्लक्ष केले आहे. रामदास आठवलेंच्या रिपाइंने स्वाभिमान बाजूला ठेवून शेवटच्या टप्प्यात भाजपाशी युती केली. त्यासाठी या पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्वत: ठाण्यात येऊन गेले. रिपाइंला उपमहापौरपदाचे आश्वासन देऊन या पक्षाच्या ११ पैकी काही उमेदवारांनी भाजपासाठी माघारही घेतली होती. ठाणेकरांनी मात्र बसपाप्रमाणेच रिपाइंच्या हातीही भोपळा दिला. या पक्षाचे शहराध्यक्ष रामभाऊ तायडे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला, हे विशेष. एमआयएमच्या ‘पतंग’ने मात्र ठाणे महापालिकेत अपेक्षितपणे भरारी घेतली. जेव्हा भाजपा, शिवसेनेसारखे पक्ष परस्परांविरुद्ध लढताना जहाल हिंदुत्वाची भाषा करतात तेव्हा एमआयएमसारख्या कडव्या पक्षांना राजकीय लाभ होतो. बाबरी मशिदीचे पतन, दंगे व बॉम्बस्फोट यानंतर मुंबईत समाजवादी पार्टीला यश मिळाले होते. आता ती जागा एमआयएमच्या पतंगाने घेतली आहे. मुंब्रा परिसरातील प्रभाग क्र. ३३ मध्ये या पक्षाने दोन जागा मिळवल्या आहेत. प्रभाग क्र. ३३ (ब) मध्ये या पक्षाच्या शेख हाजरा माकरूल आणि ३३ (ड) मध्ये आजमी शाहआलम शाहीद हे विजयी झाले. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा कब्जा होता.