बीएसयूपीच्या घरवाटपामध्ये पालिकेकडून दिव्यांगांची चेष्टा, संघटनेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 01:33 AM2019-08-14T01:33:17+5:302019-08-14T01:33:29+5:30
ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना बीएसयुपीची घरे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ठाणे : ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना बीएसयुपीची घरे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या घरांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना पालिकेच्या मुख्यालयात बोलावण्यात येत आहे. एकीकडे दिव्यांगांकडे अर्थार्जनाचे ठोस साधन नसतानाही त्यांना लांबवरच्या प्रवासासाठी मोठा खर्च करून द्राविडीप्राणायाम करावा लागत आहे. एकूणच घरवाटपाच्या नावाखाली दिव्यांगांची चेष्टाच केली जात असल्याचा आरोप विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंच संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे युसूफ खान यांनी केला आहे.
या संदर्भात ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संघटनेने पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने दिव्यांगांना १९० घरांचे वाटप करण्यात येणार आहे. हे अर्ज करण्यासाठी संबधित दिव्यांगांना स्वत: ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये येण्याची सक्ती केलेली आहे. एका दिव्यांगाला मुंब्रा भागातून ठामपा मुख्यालय गाठायचे असल्यास किमान ३०० रु पये खर्च येतो. उत्पन्न मर्यादीत असल्याने तो करण्याची ऐपत दिव्यांगांची नाही. त्यामुळे प्रभाग समितीमध्येच त्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे सुधारीत दिव्यांग व्यक्ती कायदा २०१६ कायद्यामध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या सर्वांनाच शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश दिलेले असतानाही ठामपा केवळ ८० टक्के दिव्यांग असणाऱ्यांनाच ही घरे देणार आहेत. म्हणजेच या कायद्याचेही अवमूल्यन करण्यात येत असल्याचा आरोप खान यांनी केला आहे.
घर कुठे व कितीला मिळणार याची माहितीच नाही
बीएसयूपीच्या माध्यमातून देण्यात येणारी ही घरे कुठे, कशी मोफत देण्यात येणार आहेत किंवा अर्ज पात्र झाल्यावर सदर दिव्यांग लाभार्थ्यांना खोली ताब्यात देण्यापूर्वी किती रक्कम घेण्यात येईल, या जाहिरातीमध्ये कोणाला घर देण्यात येणार आहे.
घरासाठीचे निकष काय आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे घरे आहेत, याचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. दरम्यान, नगरसेवक राजन किणे यांनी ठाण्यातील दिव्यांगांना घरे देण्यासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन खान यांना दिले आहे.