अर्थसंकल्प: ठाणेकरांना घेता येणार डबल डेकर बसमधून फिरण्याचा आनंद; इलेक्ट्रिक बस वाढणार
By अजित मांडके | Published: February 8, 2024 04:10 PM2024-02-08T16:10:16+5:302024-02-08T16:10:35+5:30
ठाणे महापालिकेचा (TMT) ६९४ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर, तिकीट भाडेवाढ नाही
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे परिवहन सेवेचा आर्थिक डोलारा सुधरावण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखत नव्या इलेक्ट्रीक बस जास्तीत जास्त संख्येने घेणे, कर्मचाऱ्यांची थकीत देणी देणे आदींसह नव्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेण्याचे ठाणे परिवहन सेवेने प्रस्तावित केले आहे. गुरुवारी ठाणे परिवहन सेवेचा ६९४ कोटींचा काटकसरीचा आणि वास्तववादी अर्थसंकल्प परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी परिवहन समितीला सादर केला. तर यंदाही कोणत्याही प्रकारची तिकीट दरात भाडेवाढ प्रस्तावित करण्यात येणार नसल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी सादर करण्यात आलेल्या परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बसचा समावेश करण्यात आला होता. ठाणे परिवहन सेवेचा २०२३ - २४ चा ४२७ कोटी १९ लाखाचा सुधारित आणि २०२४-२५ चा ६९४ कोटींचा मुळ अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.
ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात परिवहन सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन व निवृत्तीधारकांचे पेन्शन, थकबाकी व इतर देणी याकरिता तरतूद करण्यात येणार अली आहे. ठाणे परिवहन सेवेने २०१५ नंतर अद्याप नव्याने भाडेवाढ केलेली नाही. यंदा देखील कोणत्याही स्वरुपाची तिकीट भाडेवाढ करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या १२३ इलेक्ट्रिक बस पैकी साधारण ११४ बस परिवहनच्या ताफयात दाखल झाल्या आहेत. उरलेल्या बस देखील लवकरच दाखल होणार आहेत. याचजोडीला आणखीन सुमारे १३० च्या आसपास इलेक्ट्रिक बस ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल करण्याच्या दुष्टीने या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. नव्याने दाखल होणाºया बस नव नवीन मार्गांवर चालवून त्यातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ठाण्यातही आता डबल डेकर बस सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.