खड्ड्यात पडलेल्या म्हशीची तब्बल 4 तासांनंतर प्राणीमित्रांनी केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 03:46 PM2018-10-15T15:46:24+5:302018-10-15T15:53:18+5:30
कल्याण शहराच्या पश्चिम भागातील स्पोर्ट कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यात एक म्हैस पडली.
कल्याण - कल्याण शहराच्या पश्चिम भागातील स्पोर्ट कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यात एक म्हैस पडली. प्राणीमित्रांनी अथक प्रयत्नांअंती तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि तिच्या मालकाला सुपूर्द केले. स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या समोर एक खड्डा आहे. त्यावर सळई आणि पत्रे टाकून हा खड्डा झाकून ठेवण्यात आला होता. पावसाळी गवत इतत्र उगवले असल्याने ते खाण्यासाठी ही म्हैस फिरत होती. खड्डा पत्र्यानं झाकून ठेवल्याचं न कळल्यानं ती खड्ड्यात पडली. याची माहिती प्राणीमित्र महेश बनकर यांना त्यांच्या मित्राने सांगितली. बनकर यांनी अन्य मित्रसोबत घटनास्थळी धाव घेतली.
म्हैस इतक्या विचित्र पद्धतीने खड्ड्यात पडली होती की तिला बाहेर काढण्यासाठी पहार घेऊन बाजूची माती खोदून काढून खड्डा मोठा करावा लागला. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर म्हशीली बाहेर काढण्यात आले. म्हशीच्या मालकास याची कल्पना दिली. म्हशीचा मालक शेलार हा देखील त्याठिकाणी आला होता. त्याने प्राणीमित्र बनकर यांचे आभार मानले. अग्नीशमन दलासही पाचारण केले होते. अग्निशमन दलाचे जवान उशिरा पोहोचले. तोपर्यंत म्हशीला खड्ड्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पडली होती. महापालिकेने अनेक ठिकाणी रस्त्याची कामे घेतली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांची झाकणे नाहीत. तर काही ठिकाणी गटारांची कामे अर्धवट आहे. कुठे खोदकाम केले आहे. ते पूर्ण झालेले नाही. रस्त्याची कामे पूर्ण झाले तर साईट गटारे तशीच पडून आहेत.
ज्या खड्ड्यात म्हैस पडली. तो खड्डाच विचित्र होता. त्यात एखादा माणूस पडून त्याचा मृत्यूही होऊ शकतो याकडे बनकर यांनी लक्ष वेधले आहे.