पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: February 23, 2024 10:02 PM2024-02-23T22:02:41+5:302024-02-23T22:02:59+5:30
आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी: भागीदारालाही गंडा
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: पुनर्विकासाच्या नावाखाली दोन सोसायटयांमधील रहिवाशांची तसेच कॅन्सलेशन डीड तयार करुन आपल्या भागीदाराची फसवणूक करणाऱ्या कौस्तुभ कळके (४९, रा. खारकर अळी, ठाणे) या बांधकाम व्यावसायिकाला अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
यातील तक्रारदार तसेच कळके यांचे व्यावसायिक भागिदार असलेले सुनिल लिमये यांची बनावट स्वाक्षरी करुन कळके याने त्यांना भागिदारीतून बाहेर काढण्यासाठी कॅन्सलेशन डीड तयार केले. ते बँक तसेच इतर ठिकाणी देऊन लिमये हे या व्यावसातून निवृत्त झाल्याचे भासवले. त्याचबरोबर वाढीव क्षेत्रफळ देतो, असे सांगत दोन वेगवेगळया गृहसंकुलातील १० ते १२ रहिवाशांचीही त्यांने फसवणूक केली. त्याच्या प्रकल्पाचे कामही बंद असून रहिवाशांना भाडेही त्याने दिले नाही. पुनर्विकासाच्या नावाने पैसे घेऊन त्याने कामही केले नाही.
अखेर याप्रकरणी १९ डिसेंबर २०२३ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीची त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली. ही तक्रार दाखल होताच त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला. त्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि निरीक्षक विद्या पाटील यांच्या पथकाने कळके याला २३ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केली. आता या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.