बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:34 AM2018-05-12T01:34:07+5:302018-05-12T01:34:07+5:30
शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जोशी यांना पाच कोटींच्या खंडणीप्रकरणी धमकावणाऱ्या दुकलीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे
डोंबिवली : शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जोशी यांना पाच कोटींच्या खंडणीप्रकरणी धमकावणाऱ्या दुकलीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. भगवान विठ्ठल विशे ऊर्फ देवा पाटील आणि फिरोज रज्जाक शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. शनिवारी या दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जोशी हे १८ वर्षे बांधकाम व्यवसायात आहेत. खंडणी मागणाºया दुकलीने जोशी यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाच कोटी रुपये वसूल करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे फिरोजने मोबाइलवरून जोशी यांना फोन करून ‘मुझे पाच करोड रुपये दे, तेरे घर में शादी है, मुझे पैसा नही मिला तो मैं तुझे मार दुंगा’ अशा शब्दांत धमकी दिली होती. २० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता त्याने हा फोन केला होता. याबाबत जोशी यांनी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली असता खंडणीसाठी धमकी देणाºया दोन व्यक्ती खिडकाळी, देसाई परिसरात खोली भाड्याने घेऊन राहत असल्याची माहिती खबºयामार्फत त्यांना मिळाली. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पी.जी. ठाकूर आणि एन.एच. मुदगून यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून दोघांना जेरबंद केले.
भगवान हा शहापूर, तर फिरोज हा गोरेगाव परिसरात राहणारा आहे. या दोघांनी याआधी कोणाला खंडणीसाठी धमकावले आहे का? ते कोणत्या टोळीशी संबंधित आहेत, याचा तपास सुरू असल्याची माहिती जॉन यांनी दिली.