बिल्डरला रवी पुजारीच्या नावे खंडणीची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:54 AM2018-05-18T02:54:17+5:302018-05-18T02:54:17+5:30
मीरा-भार्इंदरमधील लीना ग्रुपचे बिल्डर दिलीप पोरवाल यांना रवी पुजारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने खंडणी दिली नाही, तर जीवे मारण्याची धमकी फोनवरून दिली आहे.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील लीना ग्रुपचे बिल्डर दिलीप पोरवाल यांना रवी पुजारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने खंडणी दिली नाही, तर जीवे मारण्याची धमकी फोनवरून दिली आहे. याप्रकरणी पोरवाल यांच्या फिर्यादीवरून भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये बिल्डर दिलीप पोरवाल यांचे अनेक बांधकाम प्रकल्प आहेत. शिवाय त्यांची शाळा, फर्निचर, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यवसायसुद्धा आहेत. ते शहरातले जुने बिल्डर असून राजकारणासह पोलीस, पालिका, महसूल आदी विभागांतील बडे अधिकारी आदींशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.
परदेशातील क्रमांकावरून पोरवाल यांना अनेकदा कॉल आले आहेत. समोरच्याने आपण रवी पुजारी बोलत असून खंडणी दिली नाही, तर ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी पोरवाल यांनी फिर्याद दिल्यावर भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भार्इंदर पोलीस अधिक तपास करत आहेत.
याआधीही आले होते धमक्यांचे फोन
पोरवाल यांना २००७ सालीदेखील पुजारीच्या नावाने धमक्यांचा फोन आला होता. त्यावेळी पोलिसांत फिर्याद दिली होती. पुन्हा २०१२ मध्ये पुजारीचा साथीदार असल्याचे सांगून धमक्यांचे फोन आल्याने त्यांच्या तक्रारीनुसार भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हे शाखेने दुबईवरून पुजारीच्या एका साथीदारास मोक्काखाली अटक केली असता त्याचा ताबा ठाणे ग्रामीण पोलिसांनी घेतला होता. आतापर्यंत अनेकदा पुजारीच्या नावाने पोरवाल यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांचा मुलगा गौरव हा भाजपाचा प्रदेश पदाधिकारी आहे.