बिल्डरांनी जमिनी बळकावल्या, टीडीआरला कोणी विचारेना, घोडबंदर टॉवरच्या जंगलात आदिवासींची घुसमट

By अजित मांडके | Published: September 14, 2023 07:27 AM2023-09-14T07:27:11+5:302023-09-14T07:28:01+5:30

Thane News: घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे.

Builders grabbed land, no one asked TDR, tribals encroached on Ghodbunder tower forest | बिल्डरांनी जमिनी बळकावल्या, टीडीआरला कोणी विचारेना, घोडबंदर टॉवरच्या जंगलात आदिवासींची घुसमट

बिल्डरांनी जमिनी बळकावल्या, टीडीआरला कोणी विचारेना, घोडबंदर टॉवरच्या जंगलात आदिवासींची घुसमट

googlenewsNext

- अजित मांडके
ठाणे - घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे; ज्या जागेवर असंख्य टॉवर्स उभे राहिले त्या आदिवासींना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  

नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात पाणखंडा, ठक्कर पाडा, गोवणी पाडा, बामनाली पाडा, देवीचा पाडा, गायमुख कशेळी आदि प्रमुख आदिवासी पाडे आजही या भागात आहेत; पण काँक्रीटच्या जंगलात आक्रसून गेलेली. घोडबंदर परिसरातील फ्लॅट्सची किंमत लाखोंच्या घरात गेली. परंतु आदिवासींच्या नशिबी परवडच आहे. वाघबीळ, कासारवडवली, ओवळा, मोघरपाडा भागातील स्थानिकांच्या उरल्यासुरल्या जमिनी विकास प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत. कोस्टलसाठी आता वाघबीळ आणि इतर भागातील भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे; पण तो टीडीआर घेण्यास एकही बिल्डर येत नाही, असे शेतकरी सांगतात. मेट्रोच्या कारशेडसाठी मोघरपाडा येथील २५० एकरच्या आसपास जमीन घेतली जाणार आहे. परंतु, त्याचा मोबदलाच अद्याप दिला नाही. शेतकऱ्यांनी वॉटरफ्रंटसाठी जागा दिली. त्या बदल्यात स्थानिकांना व्यवसायाची संधी दिली जाणार होती. ती जागा महिला बचत गटाला दिल्याने रहिवासी नाराज आहेत.

मुख्य समस्या
- दोन पदरी रस्ते आठ पदरी झाले असले तरी या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे तशीच. 
- मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही.
- वाघबीळ गावात नव्याने इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्या ड्रेनेजचे पाणी जाण्यासाठी नाले केले; पण ते अपूर्ण असल्याने तुंबलेले पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत जाते.

ना पाणी, ना वीज, ना स्मशानभूमी 
- वाघबीळ, कासारवडली आणि मोघरपाडा आदी भागात तीन स्मशानभूमी आहेत. परंतु कासारवडली स्मशानभूमीत ना पाणी, ना वीज, ना इतर कोणत्याही सुविधा. 
- मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरण उपलब्ध होत नाही. 
- मोघरपाडा स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी सुरू केली. परंतु त्याच्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबला गळती लागली.

एखाद्या शेतकऱ्याने समजा २००० साली आपली जमीन विकली असेल, तर त्याला तेव्हाच्या बाजार दरानुसारच मोबदला दिलेला आहे. परंतु आता जर शेतकरी किंवा स्थानिक मोबदला कमी मिळाला, असे म्हणत असेल तर ते योग्य ठरणार नाही.
- जितेंद्र मेहता, जेव्हीएम ग्रुप तथा अध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे

बिल्डरांनी आमच्या जागा कवडीमोल भावाने खरेदी केल्या. कोस्टल रोडसाठी जागा घेतल्या जात आहेत. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे. वास्तविक पाहता समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र टीडीआरला कोणी विचारत नाही. तो तसाच पडून आहे.
- संतोष भोईर, भूमिपुत्र, वाघबीळ

पूर्वी शेती केली जात होती. परंतु आता शेती नावाला उरली आहे, आता केवळ लाल पटणीची (भाताचा प्रकार) शेती केली जाते. ती कुटुंबाच्या पोटाला जेमतेम पुरेशी आहे. वस्तीला चांगले पक्के रस्ते नाहीत, पाण्याची समस्या आहे, घोडबंदरचा विकास झाला; पण आम्ही तसेच राहिलो.
- अमित भोईर, स्थानिक नागरिक

मोघरपाड्यात स्मशानभूमीत एकाच वेळेस अधिक संख्येने मृतदेह आल्यास समस्या निर्माण होते. परंतु येणाऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी मोफत लाकडे पुरविण्याचे काम करीत आहे. त्यातून सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
    - राम ठाकूर, स्थानिक समाजसेवक

Web Title: Builders grabbed land, no one asked TDR, tribals encroached on Ghodbunder tower forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे