महात्मा जोतिबा फुले रस्त्याला बिल्डरचे नाव
By admin | Published: April 10, 2016 01:19 AM2016-04-10T01:19:27+5:302016-04-10T01:19:27+5:30
महिलांना शिक्षणाची दारे खुली करणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती सोमवारी साजरी होणार आहे. भाईंदर पूर्वेतील फुले यांच्या नावाने १५ वर्षांपासून
मीरा रोड : महिलांना शिक्षणाची दारे खुली करणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती सोमवारी साजरी होणार आहे. भाईंदर पूर्वेतील फुले यांच्या नावाने १५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मार्गाचे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका मेघना दीपक रावल यांनी पालिका प्रशासनाला हाताशी धरून पुन्हा नामकरण केले. या रस्त्याला त्यांनी त्यांच्या सासऱ्यांचे नाव दिल्याने शहरात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याचा निषेध म्हणून मनसे व रिपब्लिकन पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पूर्वेतील महात्मा फुले मार्ग (केबिन मार्ग) परिसरातील प्रभाग १७ ‘ब’च्या भाजपा नगरसेविका रावल यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवारी सदर जागृती अपार्टमेंट ते फाटक पर्यंतच्या रस्त्याचे नामकरण स्वर्गीय चंदूभाई रावल असे केले. या वेळी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी भाजपा नगरसेविका डिंपल मेहता, नगरसेविका कल्पना म्हात्रे, भगवतीबेन रावल आदी उपस्थित होते. तर कार्यक्र माच्या ठिकाणी असलेल्या आधीच्या नामफलकावरील फुले यांच्या नावाला चुना फासल्याचा आरोप होत आहे.
वास्तविक तत्कालीन नगरपरिषद काळात आॅक्टोबर २००१ मध्ये स्थायी समितीने शहरातील रस्ते व चौक यांचे नामकरण करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार भार्इंदर पूर्वेतील रेल्वेस्थानकाला समांतर असलेल्या जागृती इमारत ते फाटक पर्यंतच्या रस्त्याला फुले यांचे नाव देण्यात आले होते. आजही पालिकेच्या या मार्गावरील नामफलकावर फुले यांचेच नाव आहे. असे असताना नगरसेविका रावल यांनी या रस्त्याला चक्क स्वत:चे सासरे व बिल्डर कै. चंदूभाई रावल यांचे नाव देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, भाजपा व पालिका प्रशासनानेही फुले यांचे नाव बदलण्याचा निर्णय घेत रावल यांच्या नावाला मंजुरी दिली.
याप्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित म्हणाले, की मागील वर्षी महासभेत नामकरणाचा ठराव झाला होता. त्या नुसार फुले यांचे नाव बदलून चंदूभाई रावल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आधी दिलेली नावे बदलू नये, असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे महासभेत महापौरांच्या मान्यतेने मंजूर झालेल्या ठरावांचे पालन केले आहे.
मी माझे सासरे चंदूभाई रावल यांचे नाव या रस्त्याला देण्याची मागणी केली होती. नोव्हेंबर २०१५ च्या महासभेत त्याला मंजुरी मिळाली होती. प्रशासनाने नामकरणाचे पत्र दिले आहे. त्यानुसार नामकरण सोहळा झाला, असे नगरसेविका रावल म्हणाल्या. मी कार्यक्रमात आहे. नंतर फोन करा, असे त्यांनी सांगितले. मात्र नंतर त्यांना फोन करूनही त्यांनी फोन उचलला नाही.
पोलिसांकडे तक्रारी : रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस मंगेश होनमुखे यांनी या विरोधात पोलिसांकडे तक्र ारी केल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी आयुक्तांकडे तक्र ार करणार आहोत. नगरसेविका रावल यांच्या घरासमोर व पालिका मुख्यालयात निदर्शने करणार असल्याचे ते म्हणाले. आमदार मेहता व महापौर गीता जैन यांच्या इच्छेशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. त्यांचाही या प्रकाराला आशीर्वाद आहे, असा आरोप होनमुखे यांनी केला.
महापुरुषांची नावे पुसण्याचा घाट
थोर महापुरु षांची नावे पुसण्याचा घाट भाजपा व पालिका प्रशासनाने घातला आहे. त्याच्या निषेधार्थ प्रदेश उपाध्यक्ष अरु ण कदम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून तीव्र आंदोलन करणार आहोत. भाजपाची समाजसुधारकांचा अवमान केला करण्याची हिंमत झालीच कशी? भाजपा, पालिका प्रशासन व नगरसेविकेने जाहीर माफी मागावी. बेकायदा बांधकामात सहभाग असणाऱ्या बिल्डरचे रस्त्याला दिलेले नाव त्वरित बदलावे, अशी मागणी मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सुलतान पटेल यांनी केली आहे .