रहिवाशांच्या नावाखाली बिल्डरांना पायघड्या; २५ मीटर रस्त्याचे आरक्षण बदलले, नगरविकास खात्याची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:23 AM2018-09-07T00:23:40+5:302018-09-07T00:23:48+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनलगत असलेल्या महामार्गावर पोहोचण्यासाठी रस्ता नसलेल्या वसाहतींकरिता विकास आराखड्यातील रस्त्यांचे आरक्षण बदलण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयाला नगरविकास खात्याने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे.
- नारायण जाधव
ठाणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनलगत असलेल्या महामार्गावर पोहोचण्यासाठी रस्ता नसलेल्या वसाहतींकरिता विकास आराखड्यातील रस्त्यांचे आरक्षण बदलण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयाला नगरविकास खात्याने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या महामार्गावरील मुंबई विद्यापीठाला दिलेल्या जागेपासून थेट कशेळीनाक्यापर्यंतच्या विकासकांची चांदी होणार आहे. आरक्षण बदलल्याने पाइपलाइनच्या दुसऱ्या बाजूस समांतर असा १५ मीटर रस्ता करणे आता ठाणे महापालिकेस शक्य होणार आहे. या रस्त्यामुळे या वसाहती थेट मुंबई-आग्रा महामार्गास जोडल्या जाणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मुंबई-आग्रा महामार्गालगत मुंबई विद्यापीठाला दिलेल्या भूखंडापासून भिवंडीकडे येजा करण्यासाठी २५ मीटरचा रस्ता आहे. परंतु, तो मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनवरून जातो. त्यामुळे पाइपलाइनवरील त्याचा भाग नियमानुसार रद्द केल्यामुळे सध्या हा परिसर भिवंडी रोडला कनेक्ट होत नाही. महामार्गावरून या भागात जायचे झाल्यास भिवंडीनजीकच्या कशेळीनाक्यापर्यंत जाऊन पुन्हा मागे यावे लागते. यामुळे या भागातील रहिवाशांची मोठी अडचण होत आहे.
सध्या या भागात म्हाडा वसाहतीसह प्रस्तावित परवडणाºया घरांचा प्रकल्प, वर्धमान गार्डन वसाहत, आरएनए बिल्डरसह पिरामल समूहाची ३२ एकरवरील टाउनशिप उभी राहत आहे. तेथे येजा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे या भागातील बिल्डरांच्या सदनिकांना बाजारात उठाव नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. रहिवाशांसोबतच या परिसरातील बिल्डरांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनवरील २५ रस्त्यांचे आरक्षण बदलून त्याचा रहिवासी क्षेत्रात समावेश करीत दुसºया बाजूस समांंतर असा १५ मीटरचा रस्ता करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यास महासभेसह २१ आॅगस्ट २००४ च्या शासननिर्णयानुसार एमआरटीपी अॅक्टच्या कलम ३७ (१) नुसार नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्यास मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रही घेतले होते. या प्रस्तावास नगरविकास खात्याने मंजुरी दिली. या निर्णयामुळे या परिसरातील रहिवाशांची मोठी अडचण दूर होण्यास मदत होणार आहे, हेदेखील तेवढेच खरे. रस्त्याचे काम झाल्यानंतर या वसाहती थेट महामार्गाशी जुळणार आहेत.
रहिवाशांची अडचण होणार दूर
म्हाडा कॉलनी व परिसर आणि मुंबई विद्यापीठासह बाळकुम भागातील वसाहतींना थेट मुंबई-आग्रा महामार्गास कनेक्ट करणे आता सोपे होणार असल्याचे शहर विकास विभागातील एका अधिकाºयाने या वृत्तास दुजोरा देताना सांगितले. यामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी अडचण दूर होणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.