भिवंडीत इमारत कोसळून 17 रहिवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 06:55 AM2020-09-22T06:55:59+5:302020-09-22T06:56:18+5:30
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : धामणकरनाका येथील तीन मजली इमारत सोमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास कोसळून १७ रहिवाशांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारने घोषित केली आहे.
महापालिकेने नोटीस बजाविलेल्या जिलानी या इमारतीचा विकासक सय्यद अहमद जिलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन भागांमधील इमारतीच्या पश्चिमेकडील २४ सदनिकांचा एक भाग कोसळला.
जखमींवर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शरीफ अन्सारी ठरले देवदूत
इमारतीतील रहिवासी शरीफ अन्सारी यांना त्यांच्या मित्राने आवाज देऊन इमारतीला तडे गेल्याचे सांगितले. त्यांनी पाहिले असता फरशीला व भिंतीला मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने रहिवाशांचे दरवाजे ठोठावत त्यांना बाहेर काढले आणि क्षणातच इमारत कोसळली. शरीफ एकप्रकारे देवदूतच ठरले.