पुन्हा इमारतीचा भाग कोसळला
By admin | Published: July 28, 2015 02:58 AM2015-07-28T02:58:27+5:302015-07-28T02:58:27+5:30
कोपररोड परिसरात असलेली जोशी ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एका इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली.
डोंबिवली : कोपररोड परिसरात असलेली जोशी ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एका इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली.
येथील पश्चिमेकडील बारकूबाई या धोकादायक इमारतीचा एक भाग पाठीमागील एका घरावर सकाळी १०च्या सुमारास पडला. या इमारतीच्या पाठीमागील बाजूस एक घर असून, सोमवारी इमारतीच्या गच्चीचा कठडा त्या घरावर कोसळला. या घरातील कदम दाम्पत्य जखमी झाले असून, त्यांचा ६ वर्षांचा मुलगा साहील याला मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. पण घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांसह आपत्कालीन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनीही घटनेच्या ठिकाणी भेट दिली. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करून संबंधित बांधकाम तोडा, असे आदेश या वेळी रवींद्रन यांनी दिले.
या इमारतीला लागूनच असलेली मातृछाया ही इमारतदेखील धोकादायक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तेथील रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जोपर्यंत मालकाकडून तेथेच घरे मिळण्याची लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत इमारत खाली करणार नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)