पालिका इमारतीचे बांधकाम सुरू
By admin | Published: May 24, 2017 01:01 AM2017-05-24T01:01:18+5:302017-05-24T01:01:18+5:30
अंबरनाथ नगरपालिकेच्या बहुचर्चेत अशा प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. पालिकेच्या कार्यालयाच्या मागील बाजूलाच
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या बहुचर्चेत अशा प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. पालिकेच्या कार्यालयाच्या मागील बाजूलाच असलेल्या मैदान आणि गॅरेज यांना एकत्रित करून त्या ठिकाणी ही इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या फुटींगचे काम सुरू करण्यात आले असून ही इमारत एका वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने नव्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार राज्य सरकारने प्रशासकीय इमारत उभारणीसाठी पालिकेला पाच कोटीचा निधीही मंजूर केला. या निधीसोबत पालिका स्वत:चा निधी या प्रकल्पासाठी वापरणार आहे. एकूण १२ कोटी ५३ लाखाचा हा प्रस्ताव मंजूर झाला असून निविदा प्रक्रियेत मुंबईच्या आर अॅन्ड बी इंफ्रा प्रोजेक्ट या कंपनीने हे काम ११ टक्के कमी दराने घेतल्याने आता या प्रकल्पासाठी ११ कोटी १५ लाख खर्च केले जाणार आहे.
राजकीय पक्षांचे नेते हे पनवेल आणि भिवंडी येथील निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने भूमिपूजनाला विलंब होणार होता. मात्र इमारतीच्या कामाला विलंब होऊ नये यासाठी या इमारतीच्या फुटींगचे काम करून प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
प्रशासकीय इमारतीचे काम मंजूर व्हावे आणि ती इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी प्रस्तावाला कोणताही विरोध न करता एकमताने मंजुरी दिली होती. त्यामुळे हे काम दर्जेदार कसे करता येईल यासाठीही प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करताना दिसत आहेत. या इमारतीच्या बांधकामात कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे.