इमारतींच्या लिफ्टचे कंट्रोल ड्राइव्ह चोरणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:17 AM2019-05-25T06:17:41+5:302019-05-25T06:17:46+5:30
अंबरनाथ ते ठाणे परिसरातील इमारतींच्या लिफ्टचे नियंत्रण करणाºया ‘कंट्रोल ड्राइव्ह’ या पार्टच्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.
ठाणे : अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरातील इमारतींमधील लिफ्टचे कंट्रोल ड्राइव्ह चोरी करणाऱ्या विकास तिवारी (२३, रा. बदलापूर) आणि राजेंद्र गिरी (३०, रा. नवी मुंबई) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर युनिट-४ ने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ८० हजारांचे ३९ लिफ्ट ड्राइव्ह आणि एक मोटारसायकल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शुक्रवारी दिली.
अंबरनाथ ते ठाणे परिसरातील इमारतींच्या लिफ्टचे नियंत्रण करणाºया ‘कंट्रोल ड्राइव्ह’ या पार्टच्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. याची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी तपासाचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतानाच अंबरनाथ पश्चिम भागात लिफ्ट कंट्रोल ड्राइव्हची चोरी करणारा संशयित येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे १९ मे रोजी फॉरेस्टनाका, अंबरनाथ येथून विकास या मुख्य आरोपीला पथकाने अटक केली. त्याच्याकडून इमारतींमधील लिफ्ट ड्राइव्ह काढायची उपकरणे, मोटारसायकलही हस्तगत केली. सखोल चौकशीमध्ये त्याने अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि डोंबिवली परिसरात अशी चोरी केल्याची कबुली दिली. हे लिफ्ट ड्राइव्ह त्याने नवी मुंबईतील गिरी या इसमाला विकले. २३ मेला गिरीलाही या पथकाने अटक केली. लिफ्ट ड्राइव्हचे १० गुन्हे या दोघांकडून उघड झाले.
अवघ्या तीन मिनिटांमध्ये चोरी
विकास पूर्वी लिफ्टच्या मेंटेनन्सचे काम करत होता. दुपारी १.३० ते ४ च्या दरम्यान तो एखाद्या इमारतीच्या लिफ्टमध्ये शिरायचा. शेवटच्या मजल्यावर जाऊन ३ हजार व्होल्टच्या चालू वीजप्रवाहात विद्युतवायर खोलून अवघ्या तीन ते चार मिनिटांत हे लिफ्ट कंट्रोल डाइव्ह काढून घेत असल्याचे प्रात्यक्षिकही त्याने पथकाला दाखवले.