ठाण्यात वर्तकनगरच्या पोलीस अधिकारी वसाहतीमधील इमारत ठामपाने केली सील
By जितेंद्र कालेकर | Published: May 19, 2020 05:55 PM2020-05-19T17:55:52+5:302020-05-19T18:03:44+5:30
ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षामधील सहा कर्मचाऱ्यांना गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्तांसह १४ पोलीस कोरोनाबाधित झाल्याने या कार्यालयातील कर्मचा-यांचे संख्याबळ आणण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला आहे. तर एका कर्मचा-याला लागण झाल्यामुळे वर्तकनगर येथील पोलीस अधिका-यांची एक इमारत ठाणे महापालिकेने सील केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका कर्मचा-याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वर्तकनगर येथील पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोन पैकी एक इमारत ठाणे महापालिकेने सोमवारी सील केली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयातील एका सहाय्यक आयुक्तांसह (एसीपी) १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नियंत्रण कक्षातील महिला अधिकाºयाने कोरोनावर मात केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोन पैकी एक इमारत ठाणे महापालिकेने सोमवारी सकाळी ‘सील’ केली. या इमारतीमधील सर्व १८ कुटूंबीयांना होम कॉरंटाईन केले असून त्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा या ठाणे महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणार आहेत. या पोलीस वसाहतीमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या कुटूंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयातील एका सहाय्यक पोलीस आयुक्तांसह आतापर्यंत १४ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये नियंत्रण कक्षातील दहा आणि विशेष शाखेतील एकाचा समावेश आहे. याशिवाय, वागळे इस्टेट आणि ठाणेनगर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाºयाचाही अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. नियंत्रण कक्षामध्ये गेल्या तीन दिवसात सहा पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील बाधितांची संख्या ही दहावर पोहचली आहे.
* पोलीस कुटूंबाची कोरोनावर मात
ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील महिला उपनिरीक्षक आणि तिचा मुंबईतील उपनिरीक्षक पती, सासू, आणि दोन वर्षांची मुलगी हे सर्व कुटूंब आता कोरोनातून मुक्त झाले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील दहापैकी नऊ जणांवर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच विशेष शाखेतील कर्मचा-यानेही कोरोनावर मात केल्यामुळे त्यालाही आता रुग्णालयातून घरी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* आयुक्त कार्यालयातील संख्याबळ आता ५० टक्के राहणार
‘‘ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातील दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हे खरे आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून या कक्षासह आयुक्त कार्यालयातील कर्मचा-यांचे संख्याबळ हे निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यातून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’’
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर