मुरबाडमधील ग्रामीण भागात २८ दिवसांत बांधले ३० वनराई बंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:59 AM2020-01-20T01:59:55+5:302020-01-20T02:00:22+5:30
मुरबाड तालुक्याथील पेंढारी आणि वाघाची वाडी या आदिवासी गावाने ही किमया केली आहे. २८ दिवसात ग्रामस्थांनी ३० वनराई बंधारे उभारले आहेत.
- पंकज पाटील
मुरबाड : मुरबाडमधील ग्रामीण भागात जानेवारी फेब्रुवारीनंतर गावे ओस पडण्याचे प्रमाण वाढते. शेती आणि इतर व्यवसाय नसल्याने अनेक गावे रोजगारासाठी जुन्नरच्या दिशेने जातात. मात्र हे स्थलांतर रोखण्यात आदिवासी बांधवांना यश आले आहे. ग्रामस्थांनी गावातून वाहणाऱ्या ओढ्यावर वनराई बंधारे उभारुन गाव पाणीदार केले आहे. त्यामुळे आता गावातच शेती आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे गावातील स्थलांतराचे प्रमाणही थांबले आहे. मुरबाड तालुक्याथील पेंढारी आणि वाघाची वाडी या आदिवासी गावाने ही किमया केली आहे. २८ दिवसात ग्रामस्थांनी ३० वनराई बंधारे उभारले आहेत.
जलसंधारणाची साधी, सोपी सूत्रे अंमलात आणून मुरबाड तालुक्यातील पेंढरी आणि वाघाची वाडीतील ग्रामस्थांनी गावावरील टंचाईचा कलंक धुवून टाकला आहे. गेली तीन वर्षे टप्याटप्याने या दोन गावांमध्ये लहान मोठे जलसंधारणाचे उपक्र म राबवले जात असून यंदा २८ दिवसात तब्बल ३० वनराई बंधारे बांधून अवघा परिसर जलमय केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यंदा सुमारे शंभर ते सव्वाशे एकर जागा ओलिताखाली आली आहे. परिणामी एकेकाळी शुष्क, कोरड्या, असणाºया या प्रदेशात आता जागोजागी पाण्याचे पाट आणि त्यामुळे राखली गेलेली हिरविगार शेती हेच या बंधाऱ्यांचे यश आहे. वसुंधरा संजीवनी मंडळ या संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे पेंढरी, वाघाची वाडी परिसरात लोक सहभाग आणि ‘सीएसआर’ योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीद्वारे जलसंधारणाचे प्रकल्प उभारले जात आहेत. वनराई बंधाºयांमुळे एरवी जानेवारी महिन्यात कोरडया होणाºया ओढया नाल्यांमध्ये सध्या पाच ते सहा फूट इतके पाणी आहे.
त्यामुळे या परिसरातील भेंडी उत्पादकांना फायदा झाला आहे. पावसाळयानंतर या भागातून वाहणाºया कनकविरा नदीच्याजवळचे शेतकरी भेंडीची लागवड करतात. पूर्वी या शेतकºयांना डिसेंबर आणि जानेवारी असे दोनच महिने भेंडीचे पीक घेता येत होते. गेल्या दोन वर्षांपासून अगदी एप्रिल ते मे महिन्यापर्यंत नदीच्या पात्रात पाणी टिकते. जलसंधारणामुळे हे साध्य झाले आहे.
स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामांची दखल घेऊन गेली दोन वर्षे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासन ग्रामस्थांना मदत करू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा परिसरातील गाव तलावांमधील गाळ उपसला जाणार आहे. काँक्रि टच्या बंधाºयांमुळे कनकविरा नदीला जीवदान मिळाले असून त्यामुळे परिसरातील शेतकºयांना त्याचा लाभ झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही जलसंधारणाच्या या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. त्यांचा हा सहभागच या भागाला पाणीदार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.
पूर्वी आम्ही पावसाळयानंतर मजुरीसाठी आळेफाटयाला जात होतो. तीनशे रूपये मजुरी मिळायची. प्रवास खर्च आणि जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ पाहता हे अजिबात परवडणारे नव्हते. आता पाणी उपलब्ध असल्याने गावातच शेतीची कामे मिळू लागली आहेत.
- गीता पारधी, पेंढरी
वर्षानुवर्षे आमचे गाव टंचाईग्रस्त गावांच्या यादीत होते. वसुंधरा संजीवनी मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीमुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी आता पाणीटंचाई हद्दपार केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसाठी प्रगतीचे मार्ग खुले झाले आहेत.
- गणेश पारधी, सरपंच, पेंढरी.