ठामपाचा कोविडवरच झाला बहुतांश खर्च, आठ ठिकाणी बेडची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:12 AM2021-02-06T03:12:12+5:302021-02-06T03:12:54+5:30
TMC News : ठाणे महापालिकेने कोविड रुग्णांवर उपचारासाठी एकूण ८ ठिकाणी ५,३२९ बेडची व्यवस्था केलेली होती, तसेच ठाणे जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही मोफत उपचार व औषधे पुरविलेली असून, एकूण अंदाजित १५ हजार नागरिकांना याचा लाभ झाला आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेने कोविड रुग्णांवर उपचारासाठी एकूण ८ ठिकाणी ५,३२९ बेडची व्यवस्था केलेली होती, तसेच ठाणे जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही मोफत उपचार व औषधे पुरविलेली असून, एकूण अंदाजित १५ हजार नागरिकांना याचा लाभ झाला आहे. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क व्यक्तींकरिता ठाणे महानगरपालिकेने ९ प्रभाग समितीअंतर्गत १७ हजार ७८७ बेडची सोय केलेली होती, यामध्ये क्वारंटाइन सेंटर्समध्ये दोन लाख ५६ हजार २१८ नागरिकांना क्वारंटाइन केले होते. त्यांना जेवण, नाश्ता व राहण्याची व्यवस्था मोफत दिलेली होती.
मनपामार्फत २४७ वॉर रूमच्या माध्यमातून ऑनलाइन बेड, तसेच रुग्णवाहिका वितरणव्यवस्था स्थापित केली. आरोग्य केंद्राने नोंदविलेल्या रुग्णांची आरोग्य स्थिती व लक्षणे या आधारावर रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जातात. गरज असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून देते. सेंट्रल बेड वितरण सिस्टिमद्वारे आजतागायत ९,०७७ इतक्या रुग्णांना महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था करून देण्यात आली. मोबाइल ॲपद्वारे वेळोवेळी घरोघरी सर्वेक्षण करून नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर एकूण ७५ रुग्णवाहिकांमार्फत रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, असे एकूण एक लाख २२ हजार २१० नागरिकांना महापालिकेने मोफत लाभ दिलेला आहे. महापालिकेमार्फत कोविड रुग्णांकरिता ५.५० कोटी औषधे खरेदी करण्यात आली. यामध्ये रेमडेसिवीर व टोकलीझुमॅब यांचादेखील समावेश असून, सहा कोटी खर्च शस्त्रक्रिया साधनसामग्रीवर केला आहे.
मनपाने २३ कोटी ९८ लक्ष रकमेचे सात लाख ९० हजार ॲन्टिजन टेस्ट किट खरेदी केलेल्या आहेत. शहरातील १० लाख नागरिकांच्या ॲन्टिजन टेस्ट व आरटीपीसीआर या दोन्ही तपासण्या केल्या. महापालिकेने पोस्ट कोविड सेंटरही उभारले असून यामध्ये डायटिशिअन, फिजिओथेरेपिस्ट, योगा टीचर नियुक्ती करून आजारातून बरे झालेल्यांना मार्गदर्शन केले आहे.
आतापर्यंत ८१ कोटी १५ लाखांचा खर्च
ल्ल२०२०-२१ मध्ये महसुली खर्चासाठी एक हजार ९३१ कोटी ४९ लक्ष खर्चाचे अंदाज प्रस्तावित होते. सुधारित अंदाजपत्रकात १८२ कोटी ३८ लक्ष खर्चात कपात करून ते एक हजार ७४९ कोटी ११ लक्ष केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन वेळीच केलेल्या उपाययोजनांवर आतापर्यंत प्रत्यक्ष खर्च ८१ कोटी १५ लक्ष झाला आहे. कोरोना नियंत्रणासाठी वेळीच निधी उपलब्ध करून दिल्यामुळे इतर खर्चावर नियंत्रण आणले आहे.
भांडवली खर्चासाठी दोन १५४ कोटी दोन लक्ष तरतूद प्रस्तावित होती. त्यात जवळपास ४९% कपात करून ती एक हजार ५७ कोटी ३६ लक्ष केली आहे.
२०२१-२२ मध्ये खर्चासाठी तरतुदी प्रस्तावित करताना उत्पन्नातील अपेक्षित घट विचारात घेऊन जवळपास सर्वच खर्चात कपात करण्यात आली असून, कोणतेही नवीन प्रकल्प न घेता, हाती घेतलेल्या कामांना प्राधान्य देण्यावर भर दिला आहे.