बुलेट ट्रेन : प्रशासनापुढे सेनेचे लोटांगण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:17 PM2018-07-21T23:17:38+5:302018-07-21T23:18:33+5:30
फायदा दिसला की शिवसेना भूमिका बदलते; विरोधकांची कठोर टीका
ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून राज्यपातळीवर जरी शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला असला, तरी स्थानिक शिवसेना नेत्यांनी पक्षश्रेष्ठी देतील तो आदेश पाळू, असे सांगत ठाणे महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या घेतलेल्या भूमिकेला ठोस विरोध न करता नांगी टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे भाजपावगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने बुलेट ट्रेनला असलेला विरोध यापुढेही कायम असेल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रशासनापुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून ठाण्यात बुलेट ट्रेनचा विषय चांगलाच तापला असून मनसे आणि राष्ट्रवादीने या ट्रेनला विरोध दर्शवला आहे. तसेच शिवसेनेनेसुद्धा तिला विरोध असेल, अशी भूमिका घेतली होती. परंतु, शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुलेट ट्रेनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेच नव्हे तर तिच्यासाठी विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु, नेहमीप्रमाणे ठाण्यातील स्थानिक नेत्यांनी प्रशासनापुढे नांगी टाकून गुडघे टेकल्याची अनेक उदाहरणे असल्याने आता बुलेट ट्रेनला त्यांचा विरोधही मावळेल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.हे लक्षात घेऊन शिवसेना वारंवार आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांचा फायदा होणार असेल, तर या बुलेट ट्रेनचे स्वागतसुद्धा करतील, अशी टीका काँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेने केली आहे. याबाबत संपर्क साधला असता प्रशासनाने बुलेट ट्रेनला सहकार्य करण्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. एकीकडे राज्यपातळीवर विरोध असताना दुसरीकडे प्रशासनानेच या ट्रेनला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने काय करावे, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळेच, आता श्रेष्ठींच्या आदेशाचे कारण पुढे करून त्यांनी बुलेट ट्रेनविरोधात कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यास नकार दिला आहे.
पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, त्यानुसार बुलेट ट्रेनला विरोध करायचा की नाही, ते ठरवू
- नरेश म्हस्के, सभागृह नेते, शिवसेना
सहकार्याची भूमिका घेतली असेल, तर आयुक्तांना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. शिवसेना ही डबल ढोलकी आहे. सेटलमेंट होते, तिथे मत बदलणारी ही पार्टी आहे. - अविनाश जाधव,
जिल्हाध्यक्ष, मनसे
केंद्राच्या किंवा राज्याच्या प्रत्येक प्रकल्पासाठी सहकार्य करण्याते काम आयुक्तांनी केले आहे. शिवसेनेची भूमिका चुकीची असून विरोध करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची, अशीच त्यांची अवस्था झाली आहे.
- मिलिंद पाटणकर, गटनेते, भाजपा
पालिका प्रशासनच नव्हे तर सर्व अधिकारी हे संघाच्या शाखेत जाऊन आल्यासारखे वाटत आहेत. आमचा सुरुवातीलाही या ट्रेनला विरोध होता. यापुढेही तो कायम राहणार आहे. शिवसेनेची भूमिका मात्र बुलेट ट्रेनच्या स्थानकांसारखीच झाली आहे. स्थानक बदलले की, त्यांची भूमिकासुद्धा बदलते.
- जितेंद्र आव्हाड, आमदार