बुलेट ट्रेनच्या कामाचा खड्डा ठरला जीवघेणा; खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:44 IST2025-04-10T11:44:29+5:302025-04-10T11:44:47+5:30
मुलाचा मृत्यू झाल्याने पांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बुलेट ट्रेनच्या कामाचा खड्डा ठरला जीवघेणा; खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोपर गाव येथे खोदकाम केलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या देवव्रत जुगेश पांडे (१२) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. केंद्र सरकारच्या प्रकल्पाकरिता खणलेल्या खड्ड्यांभोवती कुठलेही संरक्षक कुंपण उभारले नव्हते. त्याचा मृत्यू झाल्याने पांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
देवव्रत हा कोपर येथील चंद्राबाई अनंत पाटील या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होता. सोमवारी इयत्ता चौथीची वार्षिक परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर देऊन दुसऱ्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी देवव्रत गावातील ट्यूशनला गेला होता. ट्यूशनवरून घरी परत आल्यावर तो आपला भाऊ आणि मित्रांसोबत कोपर येथे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कॉलमसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहायला गेला. मात्र, खड्डा खोल असल्याने देवव्रतचा मृत्यू झाला. देवव्रतचे वडील जुगेश पांडे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील सहा वर्षांपासून जुगेश पांडे पत्नी, देवव्रत व आठ वर्षांचा सुनील यांच्यासोबत कोपर येथील एका चाळीत राहतात. मुलांच्या भविष्यासाठी जुगेश दिवस-रात्र रिक्षा चालवतात. मात्र, मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
जबाबदार कंपनीवर कारवाई करा : खा. म्हात्रे
पीडित कुटुंबीयांची भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी भेट घेऊन सांत्वन केले. पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी प्रतिक्रिया खासदार म्हात्रे यांनी दिली. खासदार म्हात्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नारपोली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली.